वीजचोरी पकडली, बाप-लेकाने तंत्रज्ञाला दिली जीवे मारण्याची धमकी
By शिवराज बिचेवार | Updated: June 27, 2023 18:46 IST2023-06-27T18:46:07+5:302023-06-27T18:46:53+5:30
या प्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

वीजचोरी पकडली, बाप-लेकाने तंत्रज्ञाला दिली जीवे मारण्याची धमकी
नांदेड- भोकर तालुक्यातील मौजे आमदरवाडी येथे वीज बिल वसूली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ आम्रपाली भगवान कांबळे यांनी एका घरात वीजचोरी पकडली. यावेळी बाप-लेकाने त्यांना पुन्हा घरात आली तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १२ जून रोजी घडली होती.
या प्रकरणात सोमवारी उशिरा भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.आम्रपाली कांबळे या वीजबिल वसूलीसाठी आमदरवाडी येथे गेल्या होत्या. यावेळी हिरामण गणपती मेंडके या वीज ग्राहकाने वीजचोरी केल्याचे दिसून आले. त्यांनी मीटरमध्ये छेडछाड केली होती. कांबळे या त्यांना वीजचोरी करणे गुन्हा आहे हे समजावून सांगत असताना मेंडके यांनी तुला माझ्या वडीलांनी आमच्या घरात यायचे नाही असे सांगितले. त्यानंतरही तू का आली म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मेंडके यांच्या मुलाने आम्रपाली यांना मोबाईलवर संपर्क साधून परत माझ्या घरी आली तरी, तुला सोडणार नाही, किनवटला बदली करतो अशी धमकी दिली. या प्रकरणात कांबळे यांनी भोकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.