गांजा तस्करीतून नक्षल-माओवादी चळवळीला अर्थपुरवठा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:19 AM2021-11-19T05:19:04+5:302021-11-19T05:20:00+5:30

‘एनआयए’च्या एंट्रीची केवळ चर्चा : पाेलिसांचे कानावर हात

Cannabis smuggling finances Naxal-Maoist movement?, nanded | गांजा तस्करीतून नक्षल-माओवादी चळवळीला अर्थपुरवठा?

गांजा तस्करीतून नक्षल-माओवादी चळवळीला अर्थपुरवठा?

Next

 नांदेड : जिल्ह्यात पकडल्या गेलेल्या एक हजार १२७ किलाे गांजा प्रकरणाची तार राज्यातील नक्षलवाद आणि ओडिशातील माओवादाशी जुळलेली असल्याचा संशय ‘एनसीबी’ला (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) आहे. त्यामुळेच या प्रकरणात आता ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेची एंट्री झाल्याचे सांगितले जाते. एनआयएचे पथक गुरुवारी नांदेड जिल्ह्यात येऊन गेल्याची चर्चा असली तरी पाेलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे एनआयएच्या एंट्रीबाबतचा संभ्रम कायम आहे.         

आंध्र प्रदेशातून नांदेड मार्गे जळगावात ट्रकद्वारे लाेखंडी सळ्यांच्या आड नेला जात असलेला एक हजार १२७ किलाे गांजा एनसीबीने चार दिवसांपूर्वी नायगावनजीक जप्त केला. या प्रकरणात दाेघांना अटक करण्यात आली. एनसीबी काेठडीनंतर त्यांची गुरुवारी न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली. या गांजाच्या अनुषंगाने एनसीबीने छत्तीसगढ, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत छापासत्र राबविले.  
या गांजातून हाेणाऱ्या उलाढालीचा पैसा  देशात नक्षलवादी व माओवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय आहे. हा गांजा विशाखापट्टणम येथून ओडिशा मार्गे महाराष्ट्रात येतो. या गांजातूनच नक्षल चळवळीला अर्थपुरवठा हाेत असल्याचा संशय आहे. त्यामुळेच गांजाच्या या प्रकरणावर राष्ट्रीय तपास संस्थेनेही लक्ष केंद्रित केल्याचे बाेलले जाते. मात्र, त्याला अधिकृत दुजाेरा मिळू शकला नाही.  

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू 
गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला धुळ्याचा अनिल टकलू याचा शोध सुरू आहे. गुरुवारी एनसीबीच्या पथकाकडून नांदेडमध्ये शोधमोहीम राबविली. दरम्यान, सध्या तरी या प्रकरणात कुठलेही नक्षली कनेक्शन समोर आले नसल्याचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

‘एनआयए’च्या एंट्रीबाबत साशंकता
गांजाच्या या प्रकरणात एनआयएच्या एंट्रीबाबत येथील उच्चपदस्थ पाेलीस सूत्रांनी साशंकता व्यक्त केली. एनआयए किंवा एनसीबी स्थानिक पाेलिसांना माहिती देत नसल्याने त्यांच्या कारवाईबाबत आपल्या स्तरावर फार काही सांगता येत नसल्याचे या अधिकाऱ्याने ‘लाेकमत’ला सांगितले.  

‘आरटीओ’कडे विचारणाही नाही 
गांजाच्या या प्रकरणात नांदेड पासिंगचा ट्रक वापरण्यात आला. मात्र, त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला अद्याप काेणतीच विचारणा झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. हा ट्रक नांदेडमधील नेमका कुणाचा, यात यापूर्वी किती वेळा अशा पद्धतीने गांजा राज्यात पास झाला, ताे राज्यातील विविध जिल्ह्यांतच पुरविला गेला की पुढे आणखी कुण्या राज्यात पाठविला गेला, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत आहेत.  
 

Web Title: Cannabis smuggling finances Naxal-Maoist movement?, nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.