वडिलांची अँजिओप्लास्टी झाल्याने काळजी घेण्यासाठी घरी आला, पण काळाने मुलाचा घात केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:25 IST2025-10-16T13:24:32+5:302025-10-16T13:25:27+5:30
वडिलांची काळजी घेण्यासाठी आलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वडिलांची अँजिओप्लास्टी झाल्याने काळजी घेण्यासाठी घरी आला, पण काळाने मुलाचा घात केला!
लोहा (जि. नांदेड) : अक्षय गोविंद उंडाडे (वय २८) याचा शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
अक्षय हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वडिलांची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर तो काही दिवसांपूर्वी गावाकडे लोहा येथे परतला होता. घटनेच्या दिवशी वडील गोविंद उंडाडे बाहेरगावी गेले होते. अक्षय शहरालगत कोर्ट परिसरातील शेतात गेला असताना चारा घेताना विद्युत पोलजवळील तारेतून प्रवाह आल्याने त्याला जबर विजेचा धक्का बसला.
ही घटना कळताच त्याचा चुलत भाऊ तत्काळ धावून आला आणि त्याला दुचाकीवरून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत अक्षयने प्राण सोडला होता. उंडाडे कुटुंबावर पाच महिन्यांत ही दुसरी दुःखद घटना कोसळली आहे. त्याच्या पश्चात वडील पत्रकार गोविंद उंडाडे, आई, भाऊ, बहीण, आजी-आजोबा, चुलते-काकू असा मोठा परिवार आहे.