बांधकाम गुत्तेदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून; मृतदेह फेकला दरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:44 IST2024-10-10T16:44:17+5:302024-10-10T16:44:35+5:30

मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांडा शिवारातील दरीत आढळला मृतदेह

Brutally stoned to death of construction contractor; The body was thrown into the valley of mukhed | बांधकाम गुत्तेदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून; मृतदेह फेकला दरीत

बांधकाम गुत्तेदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून; मृतदेह फेकला दरीत

- शेखर पाटील
मुखेड (नांदेड):
तालुक्यातील हरिश्चंद्र तांडा फाट्याजवळील खोल दरीत बांधकाम गुत्तेदाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक ईश्वर चावरे ( ३५) असे मृताचे नाव असून ते मंगळवारपासून गायब होते. चावरे यांचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करून मृतदेह दरीत फेकला असून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

शहरातील फुले नगर येथील अशोक ईश्वर चावर हे बांधकाम गुत्तेदारी करत. मंगळवारी सकाळी चावरे कामानिमित्त घराबाहेर पडले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भावाला फोनवरून मी गावात आहे असे अशोक म्हणाले होते. मात्र, रात्री ७ वाजता फोन बंद होता. यामुळे नातेवाइकांनी चावरे यांचा शोध सुरू केला. दरम्यान, गुरुवारी सकाळी दबडे शिरुर शिवारात शोध घेताना हरिश्चंद्र तांडा भागातील मुख्य रस्त्यावरुन पाचशे मीटर अंतरावर अशोक यांची दुचाकी सापडली. नातेवाईकांनी डोंगरात शोध घेतला असताना खोल दरीत अशोक यांचा मृतदेह आढळला. 

माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक यांच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा आहेत. दगडाने ठेचून खून केल्यानंतर मृतदेह ओढत नेऊन दरीत फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अशोक यांचा मोबाईल आढळून आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Brutally stoned to death of construction contractor; The body was thrown into the valley of mukhed