प्रेमसंबंधातून क्रूर हत्या; खून करून मुलीच्या प्रियकरास फेकले विहिरीत, बाप-लेकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:31 IST2025-10-30T16:27:43+5:302025-10-30T16:31:12+5:30
दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी

प्रेमसंबंधातून क्रूर हत्या; खून करून मुलीच्या प्रियकरास फेकले विहिरीत, बाप-लेकाला अटक
तामसा (जि. नांदेड) : हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथे एका १७ वर्षीय मुलास विहिरीत फेकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. प्रेमसंबंधातून झालेल्या या क्रूर हत्येमध्ये युवकाचा खून करून ते एका पोत्यात बांधून भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तामसा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तामसा पोलिसांनी दोन आरोपींना २९ ऑक्टोबरला भोकर न्यायालयात नेले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृत नकुल संजय पावडे (वय १७, रा. कांडली बु. ता. हिमायतनगर) येथील असून त्याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. शनिवार रात्रीपासून नकुल घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही आढळला नाही. त्यामुळे रविवारी नकुलच्या वडिलांनी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला. मंगळवारच्या दिवशी नांदेड गुन्हा शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
प्रेमसंबंधामुळे आम्ही त्याचा खून केला
आरोपी गणेश संभाजी दारेवाड (३९) याची मुलगी आणि दुसरा आरोपी विशाल गणेश दारेवाड (१९) याच्या बहिणीसोबत नकुलचे प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधातूनच आम्ही त्याचा खून केल्याचे सांगितले. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी हाके यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक सहदेव खेडेकर, पोलिस उपनिरीक्षक नरोटे शिंगारवाडी शिवारातील घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने नकुलचे शव विहिरीबाहेर काढून पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा तपास तामसा पोलिस करत आहेत.