अनैतिक संबंधातून क्रूर हत्या! दारूच्या नशेतील पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने नदीत फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:06 IST2025-10-14T16:59:36+5:302025-10-14T17:06:07+5:30
किनवटमधील थरार! पत्नीचे 'अनैतिक प्रेम' ठरले पतीचा 'काळ'; ब्रोकर प्रियकर आणि पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अनैतिक संबंधातून क्रूर हत्या! दारूच्या नशेतील पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने नदीत फेकले
किनवट (नांदेड): प्रेम आणि नात्यावरचा विश्वास उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून कट रचला आणि दारूच्या नशेत असलेल्या पतीला थेट पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले. तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
विनोद किशन भगत (वय ५१, मूळ रा. सिंदगी मो., वास्तव्यास गोकुंदा) यांचा संसार सुरू असतानाच त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफीक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले होते. पती विनोद भगत हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने, पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफीक यांनी संगनमत करून त्यांना संपवण्याचा क्रूर कट रचला.
खुनाची थरारक रात्र आणि फसवणुकीची फिर्याद
२९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी, दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यांना घेऊन दोघेही मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावर गेले. तिथे त्यांनी विनोद भगत यांना पुलावरून जिवंत खाली फेकून दिले. या क्रूर हत्येनंतर चारच दिवसांनी, म्हणजेच ३ सप्टेंबर २०२५ रोजी मयताची पत्नी प्रियंका हिने स्वतः किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची (मिसींग) तक्रार दाखल केली. मात्र, मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला, आणि हाच धागा किनवट पोलिसांना सत्य उघड करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
पोलिसांनी उलगडले रहस्य
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका विशिष्ट क्रमांकावर (प्रियकर शेख रफीक) वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले. त्या क्रमांकाच्या व्यक्तीला (प्रियकर शेख रफीक) ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे भयावह सत्य उघड झाले.
पत्नी आणि प्रियकर ताब्यात
पोलिसांनी तांब्याची अंगठी आणि कपड्यांवरून २ सप्टेंबर रोजी पोफळी शिवारात (विदर्भ, महागाव तालुका) सापडलेल्या प्रेताची ओळख पटवली. यानंतर, किनवट पोलिसांनी प्रियकर शेख रफीक आणि खुनी पत्नी प्रियंका या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. ज्या नात्यावर विश्वास ठेवावा, त्याच नात्याने दगा दिला! अनैतिक संबंधापायी एका व्यक्तीचा जीव गेला आणि त्याचे कुटुंब विस्कटले, या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे.