सख्ख्या भावांची साथ सुटली! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दूसरा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:19 IST2025-04-29T15:18:28+5:302025-04-29T15:19:15+5:30
अज्ञात भरधाव वेगतील चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, अर्धापूर बायपास रोडवरील घटना

सख्ख्या भावांची साथ सुटली! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दूसरा गंभीर जखमी
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील एका भावाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात दि. २८ एप्रिल रोजी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास अर्धापूर बायपास रोडवर घडला. या जखमींना नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता यातील एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी (बु.) येथील अनसाजी उत्तमराव शिंदे (वय ३५ वर्षे) आणि राजू उत्तमराव शिंदे (वय २९ वर्षे ) हे दोघे सख्खे भाऊ मंगळवारी सकाळी मोटारसायकल क्रं. (एम. एच. २६ बी. के. ८७०१) ने नांदेडकडे जात होते. ते अर्धापूर-नांदेड महामार्गावरील अर्धापूर बायपास रोडवर येताच भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात राजू उत्तमराव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ अनसाजी उत्तमराव शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आदित्य लाकूळे, अंकुश वडजे, शैलेष शिरसे सेवक वसंतराव सिनगारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान राजू उत्तमराव शिंदे यांचा मृत्यू झाला. वसमत फाटा महामार्ग पोलीसांनी लगेचच वाहतूक सुरळीत केली. अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी शेख नईम यांनी दिली आहे.