'माझी बायको परत आणून द्या', मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 19:07 IST2021-11-23T19:04:41+5:302021-11-23T19:07:12+5:30
Drunken son killed father : आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'माझी बायको परत आणून द्या', मद्यपी मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी
हदगाव (नांदेड): 'माझी सोडून गेलेली पत्नी आणून द्या', म्हणत दारुच्या नशेत मुलानेच वृद्ध आईवडिलांना जबर मारहाण केली (Drunken son killed father ) . यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील तळणी येथे सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान घडली. माधव परसराम गंगाळे (६५) असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील तळणी येथे माधव गंगाळे हे पत्नी गीताबाई यांच्यासह मजूरी करुन उपजीविका करतात. माधव हे गावातील एका पिठाच्या गिरणीवर काम करतात. त्यांना दोन मुले आहेत. एक मुंबईला काम करतो तर दुसरा संजय (४०) हा गावातच मजुरी करतो. तीन अपत्य असलेल्या संजयची पत्नी तीन महिन्यांपूर्वी त्रासाला कंटाळून मुलांसह घरातून पळून गेली.
याच्या रागातून संजयने सोमवारी दारू प्राशन करून आई वडिलांसोबत वाद घातले. माझी बायको सोडून गेली यास तुम्हीच कारणीभूत आहात, तिला आणून द्या नाही तर तुमचा जीव घेतो , असे म्हणत संजयने त्यांना मारहाण केली. यात वडील माधव गंगाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी मुलगा संजयला पोलिसांनी अटक केली आहे. हदगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोरे व पोलिस पाटील उद्धव पाटील यांनी पंचनामा केला.