शेतातील विहिरीत पाय घसरून मुलगा बुडाला; बुडणाऱ्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:16 IST2020-02-22T19:16:04+5:302020-02-22T19:16:31+5:30
जनावरांना वाचविताना झाली घटना

शेतातील विहिरीत पाय घसरून मुलगा बुडाला; बुडणाऱ्या मुलाला वाचविताना पित्याचाही मृत्यू
लोहा : शहरापासून पासून जवळच असलेल्या देवणेवाडी येथे शेतकरी कुटुंबातील पिता-पुत्राचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
लोहा शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावरील देवणेवाडी येथील शेतकरी हनुमंत माधवराव चौकले ( ५५ ) यांची देवणेवाडी शिवारात गावालगत शेती आहे. रब्बी पीकाची राखण करण्यासाठी सकाळपासूनच चौकले पिता-पुत्र शेताकडेच होते. हनुमंत चौकले यांचा १५ वर्षीय मुलगा शिवानंद हनुमंत चौकले हा जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला. विहिरीला कठडे नसल्याने पाय घसरून शिवानंद विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडत असल्याचे पाहून पिता हनुमंत यांनी उडी घेतली. मात्र, त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पिता- पुत्रांचा बुडून मृत्यू झाला.