बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण; दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:22 IST2020-01-28T15:20:10+5:302020-01-28T15:22:20+5:30
शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लिल चित्रफित दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती.

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण; दोन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
बिलोली (जि़ नांदेड) : शंकरनगर येथील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल व दयानंद राजुळे यांनी केलेले कृत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांना जिल्हा सत्र न्या. विक्रमादित्य मांडे यांनी सोमवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़
शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लिल चित्रफित दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. दोन्ही शिक्षकासह ही घटना दडपण्याच्या हेतूने मदत करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांच्या विरुद्ध रामतीर्थ ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता; परंतु आरोपी त्यानंतर फरारच होता़ नऊ दिवसानंतर २६ जानेवारी रोजी ३ पैकी २ आरोपींना पोलीस पथकाने परभणी जिल्ह्यातून अटक केली़ सोमवारी त्यांना बिलोली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने धनंजय शेळके आणि प्रदीप पाटील या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ यावेळी न्यायालयात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.