नांदेड : पोलिस दलात गेल्या काही वर्षांत अनेक अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याचे आदेश आस्थापनाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदरसिंह यांनी काढले आहेत. २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांत पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त अशा तब्बल ७५ जणांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामुळे पदोन्नती नाकारलेल्या अशा अधिकाऱ्यांना पुढील पदोन्नतीसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पोलिस दलात अनेक अधिकारी वर्षानुवर्ष आहेत त्याच जिल्ह्यात राहतात. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात येतात तर काही जण पदोन्नती नाकारण्याच्या वाटेने जात आहेत. तेच ठिकाण टिकवण्याचा प्रयत्न करतात. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करावी, याबाबत २०१०, २०१६ आणि २०१९ ला शासनाने आदेश काढून कार्यवाहीबाबत आदेश दिले होते. त्यात गेल्या दोन वर्षांत पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त अशा ७५ जणांनी पदोन्नती नाकारली आहे. त्यामध्ये पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, बृहन्मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक ग्रामीण, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर ग्रामीण, सांगली येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नती नाकारणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे.
त्यात वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दर्शवल्यास त्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या निवड यादीतून काढून टाकण्यात येणार आहे. पुढील दोन वर्ष होणाऱ्या निवड सूचीमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षीच्या पदोन्नतीसाठी पात्रता येणार आहे. ज्यांनी कायमस्वरूपी पदोन्नती नाकारली आहे, त्यांचा पुढील कोणत्याही निवड सूचीमध्ये समावेश केला जाणार नाही.