मातृवंदना योजनेंतर्गत दिला ५८ हजार महिलांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:31+5:302021-03-06T04:17:31+5:30
देशात दर तीन महिलांमागे एकतरी कुपोषित बालक आहे. कुपोषणामुळे मातांची बालके कमी वजनाची असतात. बालकांचे कुपोषण मातेच्या गर्भाशयातच ...

मातृवंदना योजनेंतर्गत दिला ५८ हजार महिलांना लाभ
देशात दर तीन महिलांमागे एकतरी कुपोषित बालक आहे. कुपोषणामुळे मातांची बालके कमी वजनाची असतात. बालकांचे कुपोषण मातेच्या गर्भाशयातच सुरू होते. त्याचा एकूणच जीवनचक्रावर अनिष्ट परिणाम होत असल्याने प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते. लाभार्थ्याने पहिल्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी गरोदरपणाची नोंद अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे पाळी चुकल्यानंतर १५० दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. पहिला हप्ता घेण्यासाठी लाभार्थ्याने प्रपत्र-१ ए आवश्यक त्या कागदपत्रांसह भरणे आवश्यक आहे. तर, गरोदरपणाच्या सहा महिन्यांनंतर व किमान एक प्रसूतिपूर्व तपासणी झाली असल्यास लाभार्थ्याने प्रपत्र-१ बी तसेच बाळाच्या जन्माची नाेंद झाल्यानंतर, बाळाला बीसीजी, ओपीव्ही यांची एक मात्रा तसेच तत्सम लसीच्या तीन मात्रा मिळाल्याची खात्री झाल्यानंतर लाभार्थ्याने प्रपत्र-१ सी भरणे आवश्यक आहे.
योजनेमध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत त्या महिलेला एकूण पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी गर्भवती झाल्यापासून प्रत्येक टप्प्यात अर्ज करावा लागतो. शहरातील महिलांनी आपल्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच आशा, आरोग्यसेविका व अंगणवाडीसेविका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांच्या प्रतिक्रिया
१. या योजनेंतर्गत मला व माझ्या बाळाला लाभ देण्यात आला. कोरोनाकाळात या योजनेतून मिळालेल्या अनुदानाची खूप मदत झाली. तीन टप्प्यांत अनुदान देण्यात आले. - शालनबाई उपाडे, तरोडा, नांदेड
२. मातृयोजनेत नावनोंदणी करण्याची माहिती अंगणवाडीताईंनी दिल्यानंतर मी नोंदणी केली. त्यानंतर दुसरी नाेंदणी गरोदरपणात केली. तर तिसरी नोंदणी बाळ झाल्यावर केली. - कविता जाधव, तरोडा, नांदेड