नांदेडमध्ये अस्वलाचा थरार! किनवट तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, ७ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:13 IST2026-02-12T14:04:06+5:302026-02-12T14:13:00+5:30
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धानोरा परिसरात अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

नांदेडमध्ये अस्वलाचा थरार! किनवट तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, ७ जण जखमी
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धानोरा परिसरात अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धानोरा येथील शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने शेतकऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यात दत्ता बळीराम पवार या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
शेतकऱ्यांचा आरडाओरडा ऐकून मदतीला धावून आलेल्या इतर लोकांवरही अस्वलाने हल्ला केला. यात एकूण आठ जण अस्वलाच्या तावडीत सापडले.
जखमींना रुग्णालयात दाखल
या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यात शंकर तानाजी जाधव, सुदर्शन पवार, चंद्रसेन शेषराव पवार आणि राठोड यांचा समावेश आहे. तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत.
परिसरात भीतीचे सावट
रात्रीच्या वेळी झालेल्या या हल्ल्यामुळे धानोरा आणि आसपासच्या गावांतील नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अस्वलाचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
वन विभागाचे आवाहन
"परिसरात अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे. तसेच सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.