बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:06 IST2025-07-05T20:05:17+5:302025-07-05T20:06:01+5:30

जात पडताळणी करून देते सांगत घेतले १५ हजार रुपये

BARTI's Nanded District Project Officer Sujata Pohare arrested by ACB while taking 15 rupees bribe | बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे एसीबीच्या जाळ्यात

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकरराव पोहरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तक्रारदाराने जात पडताळणी कार्यालयात आपल्या मुलाचे अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी दिनांक १३ मार्च २०२५ रोजी ऑफलाइन अर्ज दाखल केला होता. शिवाय याच दिवशी त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदार आणि पुन्हा आपल्या मुलाचे प्रमाणपत्र ऑनलाइनही दाखल केले होते. यानंतर आरोपी लोकसेविका सुजाता पोहरे यांची त्यांनी भेट घेतली मी काम करत असलेल्या विभागाचे शेजारीच जात पडताळणी भागाचे काम चालते. त्यामुळे तिथे माझी ओळख असून मी तुमचे काम करून देते. परंतु पैसे भरावे लागतील, अशी त्यांनी तक्रारदारांकडे मागणी केली होती. यावेळी २० हजार रुपये टोकन दिल्यास तुमचे काम होईल अन्यथा होणार नाही असेही त्यांनी सांगितले होते. मात्र हे प्रकरण १५ हजारावर रुपयांवर ठरविण्यात आले.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून आज दिनांक ३ जुलै रोजी समाज कल्याण कार्यालय परिसरात सुजाता पोहरे यांचे कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. ज्यात सुजाता पोहरे आणि १५ हजार रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची अंग झडती घेतली असता पोहरे यांच्याकडे नगदी ५० हजार रुपये आढळून आले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल मेनका पवार, यशवंत दाबनवाड, ईश्वर जाधव, रमेश नामपल्ली यांच्या पथकाने केली आहे.

दोन महिला तलाठ्यांनंतर प्रकल्प अधिकारी जाळ्यात
भ्रष्टाचाराची पाळेमुळे खाेदून काढण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. गत महिनाभरात पोलिस दल, महसूल विभाग त्यापाठोपाठ कामगार अधिकारी व आता समाजकल्याण विभागात यशस्वी सापळा कारवाई केली आहे. १५ दिवसांपूर्वी दोन महिला तलाठ्यांना पथकाने लाच घेताना पकडले होते. त्यापाठोपाठ जिल्हा प्रकल्प अधिकारी पदावर असलेली महिला लाच घेताना पकडल्या गेली. त्यामुळे महिला लोकसेवकसुद्धा लाचखोरीत काकणभर सरस ठरत असल्याची चर्चा होत आहे.

Web Title: BARTI's Nanded District Project Officer Sujata Pohare arrested by ACB while taking 15 rupees bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.