सरकार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 00:13 IST2020-12-31T00:13:24+5:302020-12-31T00:13:35+5:30
शरद पवार; ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी

सरकार पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी- शरद पवार
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर दोन महिन्यांत त्यांना सरकार पाडायचे होते. मग सहा महिने आणि नंतर पुन्हा आठ महिन्यांत सरकार पाडणार होते. पण काहीच झाले नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा पवार यांनी केला.
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या समन्सवरूनही पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. हा सत्तेचा दुरूपयोग आहे. मलाही ईडीची नोटीस पाठविण्याचा प्रयत्न झाला. राज्य सहकारी बँकेचा मी सदस्यही नव्हतो आणि तिथे माझे खातेही नव्हते. नंतर त्यांनी ती नोटीस परत घेतली, असे पवार म्हणाले.