गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
नांदेड - लोहा तालुक्यातील दापशेड आणि देगलूर तालुक्यातील दावणगीर शिवारात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दापशेड येथील ज्ञानोबा श्रीराम सोनवणे हा युवक कारेगाव येथे मतदानासाठी गेला होता. १८ जानेवारी रोजी पत्नीसह पालम तालुक्यातील पेंढ येथील सासरवाडीत गेला. त्यानंतर २५ जानेवारी रोजी दापशेड शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दावणगीर शिवारात खुशाल मारोती देवकत्ते या तरुणाने सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या कारणावरुन गळफास घेतला.
बाजारवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड- माहूर तालुक्यातील बाजारवाडी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. ही कारवाई २५ जानेवारी रोजी करण्यात आली. या ठिकाणी कल्याण मटका सुरु होता. पोलिसांनी आरोपींकडून आठ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
चार शेळ्या आणि बोकड लांबविले
नांदेड- हिमायतनगर तालुक्यातील गणेशवाडी येथे टिनपत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या चार शेळ्या आणि बोकड लंपास करण्यात आले. या प्रकरणात हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दिगांबर तुकाराम येडगे यांनी चारल्यानंतर शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. ५० हजार रुपये किमतीच्या चार शेळ्या आणि एक बोकड लंपास करण्यात आले.
कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ
नांदेड- बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला.आमच्यावर चार लाख रुपयांचे कर्ज झाले असून ते फेडण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन येण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.