थकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST2021-03-17T04:18:11+5:302021-03-17T04:18:11+5:30
महावितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. शिवाय आकडे टाकून अवैधरित्या विजेची चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई ...

थकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण : गुन्हा दाखल
महावितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. शिवाय आकडे टाकून अवैधरित्या विजेची चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू आहे. सोमवारी तंत्रज्ञ रामकृष्ण दासरवाड, गणेश पांचाळ, गजानन ढोरे, तानाजी शिंदे व युवराज जाधव हे शहरातील बजरंग नगर परिसरात वीज बिल वसुली करत असताना वीजग्राहक संभाजी माणिकराव डोईवाड यांच्याकडे थकीत असलेल्या वीज बिलाबाबत गेले होते. आपली दहा हजार रुपयांची थकबाकी असून ती तत्काळ भरा अन्यथा नियमानुसार वीजपुरवठा तोडावा लागेल अशी विनंती केली असता संभाजी डोईवाड याने तू लाईट कशी कट करतोस ते बघतोच असे म्हणत तंत्रज्ञ दासरवाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.तसेच पीव्हीसी पाईपने मारण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक अभियंता नवनीत मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात डोईवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.