आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:31 IST2020-07-31T19:29:45+5:302020-07-31T19:31:42+5:30
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता एवढीच माहिती मिळाल्याचे सांगितले.

आशुतोष भाकरे याच्यावर सुरू होते मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार
नांदेड : मराठी मालिकांमधील नवोदित कलावंत आशुतोष भाकरे (३२) याच्या आत्महत्या प्रकरणात अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत़ मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे मुंबईत मानसोपचारतज्ज्ञाचा सल्लाही घेण्यात आला होता. हे उपचार सुरू असतानाच भाकरे यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असली तरी अद्यापपर्यंत ते कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे आता या तपासाकडे लक्ष लागले आहे़
नवोदित कलाकार आणि मराठी टीव्ही मालिकामधील आघाडीची अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे याने २९ जुलै रोजी दुपारी नांदेड शहरातील गणेशनगरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ साडेचार वर्षापासून भाकरे हे मुंबईला राहत होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात ते नांदेड येथे परतले होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांना विचारले असता या प्रकरणाची अकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद घेतली आहे. कसलीही सुसाईट नोट सापडलेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता एवढीच माहिती मिळाल्याचे मगर यांनी सांगितले.
नवीन काम नसल्याने निराश
गेल्या चार महिन्यांत कोणतेही नवीन काम त्यांना मिळालेले नव्हते. यातून ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. या अनुषंगाने मुंबई येथे मानसोपचारतज्ज्ञाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार उपचारही सुरू होते. मात्र, त्यांनी बुधवारी आत्महत्या केली. आशुतोषने ‘विचार ठरला पक्का’, ‘भाकर’ या चित्रपटातून काम केले होते़ तसेच शॉर्टफिल्ममध्येही त्याची भूमिका होती़ ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मयुरी देशमुख ही त्याची पत्नी होती़