भिकेच्या पैशांवरून वाद; दोन भिकाऱ्यांनी साथीदार भिकाऱ्याला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:52 IST2024-11-14T17:52:22+5:302024-11-14T17:52:46+5:30
आधी दारू पाजली त्यानंतर आवळला गळा

भिकेच्या पैशांवरून वाद; दोन भिकाऱ्यांनी साथीदार भिकाऱ्याला संपवले
नांदेड : शहरातील वेगवेगळ्या भागात भीक मागून उदरनिर्वाह करीत असलेल्या भिकाऱ्यांमध्ये भिकेच्या पैशांवरून वाद झाल्यानंतर दोघांनी मिळून एकाचा खून केला. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
कलम राज थापा, राजेश केशी आणि हरी थापा हे तिघेही जण शहरातील वेगवेगळ्या भागात भीक मागून उदरनिर्वाह करतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी नगीना घाट परिसरात वास्तव्य करतात. त्यात कलम राज थापा आणि राजेश केशी आणि हरी थापा यांच्यात भिकेच्या पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर २२ऑक्टोबर रोजी दोघांनी कलम राज थापा याला दारू पाजली. त्यानंतर वाद घालून गळा आवळून त्याचा खून केला.
पोलिसांना दुसऱ्या दिवशी कलम थापा याचा मृतदेह आढळून आला. परंतु एखाद्या जुनाट आजारामुळे हा मृत्यू झाल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात हा खून असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर राजेश केशी आणि हरी थापा या दोघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोउपनि बालाजी किरवले यांनी ठाण्यात तक्रार दिली.