घरगुती वादातून आणखी एका महिला नायब तहसीलदारांवर हल्ला; हल्लेखोर भाऊजी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:07 IST2023-01-23T13:06:29+5:302023-01-23T13:07:18+5:30
तहसील कार्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असताना भोकरच्या महिला नायब तहसिलदारांवर घरात कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

घरगुती वादातून आणखी एका महिला नायब तहसीलदारांवर हल्ला; हल्लेखोर भाऊजी अटकेत
भोकर ( नांदेड) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नायब तहसीलदारांवर भावानंतर भावजयीने हल्ला करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला केल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यात देखील अशीच घटना पुढे आली आहे. भोकर येथील महिला नायब तहसीलदारांवर नातेवाईकाकडूनच घरगुती कारणावरून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न आज सकाळी झाला आहे. या हल्ल्यात नायब तहसीलदार रेखा चामणार या सुदैवाने बचावल्या आहेत. दरम्यान, आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भोकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार रेखा चामणार या शहरातील देशपांडे काॅलनीत वास्तव्यास आहेत. दि. २३ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयाकडे निघण्याच्या तयारीत होत्या. अचानक बहिणीचा नवरा असलेला नातेवाईक बालाजी नारायण हाके (ग्रामसेवक, कारला, ता. हदगाव, ह. मु. श्रीकृष्णनगर, भोकर ) हा तेथे कोयता घेऊन आला. काही कळायच्या आत त्याने चामणार यांच्यावर हल्ला केला. याचवेळी पुतण्या व शेजारील लोक धावून आल्यामुळे या हल्ल्यात रेखा चामणार बचावल्या.
संपत्तीवरून केला हल्ला
बालाजी हाके याने पत्नीसोबत पटत नसल्यामुळे व सासरच्या संपत्तीत हक्क मिळविण्यासाठी रेखा चामणार यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, शस्त्रबंदी कायदा व इतर भादवी कलमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोहेका संजय पांढरे करीत आहेत.