इसापूरचे पाणीपाळ्याचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:08 IST2018-11-13T00:06:44+5:302018-11-13T00:08:34+5:30
प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

इसापूरचे पाणीपाळ्याचे वेळापत्रक जाहीर
नांदेड : उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे रबी व उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
१५ आॅक्टोबर २०१८ रोजी धरणात ६३५.६५ दलघमी (६५.९३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार बिगरसिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता रबी हंगामात ३ पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात ४ पाणीपाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. पाणीपाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढीलप्रमाणे राहील. पाऊस, कालवाफुटी व इतर अपरिहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील, याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.
आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रबी हंगामी, द्विहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही / मंजूर उपसा / मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी / नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात व विहीत दिनांकापूर्वी संबंधित शाखा कार्यलयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र २० आर. च्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाºया नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदी-नाल्यास वाया जावून ठारावीक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणीपाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणीउपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरित करण्यात आले आहे, त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी व इसापूर धरण जलाशय, नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसासिंचन योजनाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.१ नांदेड यांनी केले आहे.