बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:59 IST2025-02-07T15:58:40+5:302025-02-07T15:59:26+5:30
त्यांनी खुर्चीसाठी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेऊन शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचविण्याचे काम केले.

बाळासाहेबांच्यानंतर काहीजण शिवसैनिकांना घरगडी, नोकर समजू लागले होते: एकनाथ शिंदे
नांदेड: शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. परंतु ते गेल्यानंतर काहीजण कार्यकर्त्यांना घरगडी, नोकर समजू लागले होते. त्यांनी खुर्चीसाठी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेऊन शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचविण्याचे काम केले. शिवसेना हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे हे दाखवून दिले. लोक सत्तेकडे जातात. मात्र, आम्ही ५० आमदार आणि मंत्री सत्तेच्या विरोधात गेलो होतो. ते केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नवीन मोंढा मैदानावर आयोजित आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. ते म्हणाले, आमच्याकडे वशिला चालत नाही. मेरीटवरच सर्व निर्णय होतात. परंतु त्या अगोदर लाचार मंडळींनी खुर्चीसाठी बाळासाहेबांची शिवसेनाच गहाण ठेवली होती. अनेक आमदारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही विरोधात जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत दोन लाख आणि विधानसभेत त्यांच्यापेक्षा १५ लाख अधिक मते आम्हाला मिळाली. यावरून खरी शिवसेना कुणाची हे दिसते. कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळे दररोज शिवसेनेत नवीन लोक येत आहेत. गेल्या अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून जनतेसाठी आम्ही काम केले. अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला त्यांच्या दुखाची जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजनांवर ४५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. विरोधकांनी आम्हाला शिव्या-शाप दिले. परंतु त्यांच्या आरोपाला आम्ही कामातून उत्तर दिले. त्यामुळे आज हे आजचे देदिप्यमान यश आपल्याला मिळाले आहे, असेही शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींचा भाऊ हेच सर्वांत प्रिय
सामान्य शेतकरी कुटुंबातील मी मुख्यमंत्री झालो. आता उपमुख्यमंत्री आहे. मला खुर्ची दिसत नाही. मला फक्त माणसे दिसतात. त्यांच्या अडीअडचणी दिसतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपेक्षा मला लाखो लाडक्या बहिणींचा भाऊ हे सर्वांत प्रिय आहे. असेही शिंदे म्हणाले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आमदार बाबूराव कदम, जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांची उपस्थिती होती.
गाण म्हणत बाबूराव मुंबईत धडकले
लोकसभेला फेक नरेटिव्हमुळे बाबूराव कदम यांची लोकसभेत जाण्याची संधी हुकली परंतु विधानसभेत आला बाबूराव गाण म्हणत त्यांनी मुंबईला धडक दिली. बोंढारकर यांच्या बाबतीत अनेक सर्वे यायचे. ते मागे आहेत असे मी म्हणायचो. परंतु हेमंत पाटील ते निवडून येणार अशी गॅरंटी देत होते. जिल्हाप्रमुख आज आमदार झाला याचा आनंद आहे. कल्याणकरांच्या नावातच कल्याण आहे. त्यांनी अडीच वर्षात साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी खेचून नेला, असेही शिंदे म्हणाले.
संजय राऊतांनी शिवसेना फोडली
आज काही सडके आंबे आम्हाला बदनाम करीत आहेत. पक्ष चोरला, चिन्ह चोरले असे बोलत आहेत. परंतु संजय राऊत याने शिवसेना फोडली आहे. शिवसेना संपवायची चाल काही मंडळींची होती. परंतु ही चाल शिंदे यांनी वेळीच ओळखली. त्यामुळे भगवा वाचला. आम्ही यावेळी शंभरच्या पुढे असतो परंतु मागून अजितदादा आले अन् आमचा प्राॅब्लेम झाला असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.