हेरॉईन प्रकरणातील आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:57 IST2019-12-20T18:56:53+5:302019-12-20T18:57:57+5:30
रुग्णालयात नेल्यानंतर दिला गुंगारा

हेरॉईन प्रकरणातील आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळाला
नांदेड : शहरातील गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात पांढऱ्या रंगाच्या पावडर चिट्टाची (हेरॉईन) विक्री करणाऱ्या राजेंद्रसिंघ जोगींदरसिंघ (२२) या युवकास वजिराबाद पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीने रुग्णालयातून पोलिसांना चकमा देत गुरुवारी रात्री ९ वाजेदरम्यान तेथून पळ काढला.
गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात १७ डिसेंबरच्या रात्री हेरॉईनची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या माहितीवरून पोलिसांनी राजेंद्रसिंघ याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे ०़२७ मिग़्रॅम इतके हेरॉईन आढळले.वजिराबाद पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून गेल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
चार दिवसांची मिळाली होती कोठडी
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या राजेंद्रसिंघ याला चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली होती़ त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालयात नेले होते़ गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांना गुंगारा देत राजेंद्रसिंघने पळ काढला आहे़