मुलींसोबत नाचण्याचा हट्ट, विरोध करणाऱ्या तरुणावर टारगटांचा खंजरने हल्ला
By शिवराज बिचेवार | Updated: April 17, 2023 18:49 IST2023-04-17T18:49:40+5:302023-04-17T18:49:51+5:30
काही टारगट मुले मुलींसोबत नाचण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्याला तरुणांनी रोखले.

मुलींसोबत नाचण्याचा हट्ट, विरोध करणाऱ्या तरुणावर टारगटांचा खंजरने हल्ला
नांदेड : भीम जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीमध्ये मुलींसोबत नाचण्याचा काही जणांनी हट्ट केला होता. त्याला एका तरुणाने विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच रागातून तरुणावर खंजरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना समता नगर भागात घडली.
या प्रकरणात तिघांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सतीश विजय गोवंदे असे जखमी चालकाचे नाव आहे. भीम जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत काही टारगट मुले मुलींसोबत नाचण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्याला गोवंदे यांनी रोखले. यावेळी आरोपी गोवंदे यांच्यासोबत वाद घालून निघून गेले. १५ एप्रिल रोजी समतानगर पाटीजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोवंदे हे पायी जात असताना मागाहून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर खंजरने हल्ला केला. यामध्ये गाेवंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात शिवप्रसाद अमरोहा, प्रज्वल कांबळे आणि रतन कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि देशमुख करीत आहेत.