छत दुरुस्ती करताना विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 20:06 IST2023-06-27T20:06:19+5:302023-06-27T20:06:37+5:30
हवा सुटल्याने घरासमोरील विद्युतवाहिनी छतावर आली

छत दुरुस्ती करताना विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्याने निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू
नांदेड: पावसात छत गळत असल्यामुळे दुरूस्तीसाठी छतावर गेलेल्या ६३ वर्षीय सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने शॉक लागून करूण अंत झाला. ही घटना आज दुपारी सुनील नगर, बळीरामपूर (ता. नांदेड) येथे उघडकीस आली.
नवीन नांदेडातील सुनीलनगर बळीरामपूर येथे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक बळीराम दत्तात्रय वाघमारे राहत. आज पावसामुळे घराच्या छतास गळती सुरू आहे. दुरुस्तीसाठी सकाळी दहा ते साडेदहा वाजेचे दरम्यान ते छतावर गेले. दरम्यान, साडेअकराचे सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता. शिवाय, हवा सुटली असल्याने घराच्यासमोरील विद्युतवाहिनीचा स्पर्श वाघमारे यांच्या उजव्या पायाला झाला. यात जबर धक्का बसून वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत बळीराम वाघमारे यांच्या पत्नी रूक्मिणबाई बळीराम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात २७ जून रोजी सायंकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार श्यामसुंदर मुपडे व त्यांचे सहकारी कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.