कापूस वेचणाऱ्या महिलेवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला; धाडसी चिमुकल्यामुळे वाचला आईचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:19 IST2025-12-23T19:18:51+5:302025-12-23T19:19:50+5:30
हा भयानक प्रसंग पाहून सोबत असलेल्या मुलाने आणि मजुरांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. लोकांचा आवाज ऐकून अस्वलाने जखमी महिलेला सोडून जंगलाकडे धाव घेतली.

कापूस वेचणाऱ्या महिलेवर अस्वलाचा जीवघेणा हल्ला; धाडसी चिमुकल्यामुळे वाचला आईचा जीव
-नितेश बनसोडे
माहूर (नांदेड): माहूर तालुक्यातील बामनगुडा (गोंडखेडी) येथील शेतशिवारात मंगळवारी दुपारी अस्वलाने एका महिलेवर भीषण हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात लता सुरेश तोडसाम (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या तोंडावर, कपाळावर आणि मानेवर अस्वलाने खोल जखमा केल्या आहेत. मुलाने आणि शेजारील मजुरांनी केलेल्या धाडसी आरडाओरड्यामुळे अस्वलाने जंगलात धूम ठोकली, ज्यामुळे महिलेचे प्राण थोडक्यात वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, लता तोडसाम या आपल्या मुलासह आणि एका मजुरासोबत शेतात कापूस वेचणीचे काम करत होत्या. त्यांचे पती काही कामानिमित्त घरी गेले असतानाच, शेताला लागून असलेल्या घनदाट जंगलातून एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. अस्वलाने थेट त्यांच्या चेहऱ्यावर हल्ला केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. हा भयानक प्रसंग पाहून सोबत असलेल्या मुलाने आणि मजुरांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. लोकांचा आवाज ऐकून अस्वलाने जखमी महिलेला सोडून जंगलाकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पती सुरेश तोडसाम यांनी शेतात धाव घेतली आणि पत्नीला सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथून त्यांना तात्काळ माहूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. जखमांचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
वनविभागाकडून मदतीचे आश्वासन
घटनेनंतर मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष सिरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे अस्वलाच्या विष्ठेचे नमुने आणि पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. वनविभागाने तातडीने पंचनामा केला असून जखमी महिलेला शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे बामनगुडा परिसरात भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या हिंस्र प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.