भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:51 IST2025-01-09T16:50:42+5:302025-01-09T16:51:30+5:30
शाळेनंतर वडिलांना शेत कामात मदत करणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड) : अर्धापूर-तामसा रोडवर उभ्या सोळा वर्षीय मुलास अज्ञात वाहनाने चिडरल्याची घटना आज, गुरुवारी ( दि.९ ) सकाळी घडली. श्रीनिवास अडकिणे ( रा.हमरापूर ता.अर्धापूर ) असे मृत मुलाचे नाव आहे.
प्राथमिक माहिती अशी की, श्रीनिवास अडकिणे हा आज पहाटेच्या सुमारास तामसा ते अर्धापूर रस्त्यावरून चुलते कचरू मारोतराव अडकिणे (चुलते) यांच्यासोबत शौचास जात होता. काही अंतरावर रस्त्याकडेला थांबलेल्या श्रीनिवासला भरधाव वेगतील अज्ञात वाहनाने चिरडले. यात श्रीनिवास हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
मृत श्रीनिवास जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथे नववीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व एक छोटा भाऊ असा परिवार आहे. शाळेनंतर वडिलांना शेत कामात मदत करणाऱ्या मनमिळावू स्वभावाच्या श्रीनिवासच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.