३६४ सहायक पोलिस निरीक्षकांना आदल्या रात्री पदोन्नती; दुसऱ्या दिवशी स्थगनादेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:05 IST2025-08-23T20:05:11+5:302025-08-23T20:05:26+5:30
रिलिव्ह-जॉईनिंग रोखले, पदोन्नतीला ‘ब्रेक’ लागल्याने ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांचा आनंद ठरला औटघटकेचा

३६४ सहायक पोलिस निरीक्षकांना आदल्या रात्री पदोन्नती; दुसऱ्या दिवशी स्थगनादेश
नांदेड : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्यातील ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक म्हणून नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी हे पोलिस अधिकारी उत्सुक होते. मात्र त्यांचा हा आनंद अवघ्या काही तासातच मावळला. कारण या पदोन्नतीला मॅटमधील एका प्रकरणामुळे ब्रेक लागला आहे.
राज्याच्या विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने ३६४ ‘एपीआय’ला पदोन्नती देऊन पोलिस निरीक्षक बनविण्यात आले होते. त्यांना पसंतीचा महसूल विभाग वाटप करून पदोन्नतीवरील पदस्थापनाही निश्चित केली गेली होती. यातील अनेक सहायक पोलिस निरीक्षक वर्षानुवर्षे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र कायदेशीर अडचणी व तांत्रिक बाबींमुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. बहुप्रतिक्षित ही पदोन्नतीची यादी २१ ऑगस्टला जारी झाली. ३६४ पोलिस निरीक्षक नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तयारी करीत असतानाच अवघ्या काही तासांत पदोन्नतीचा आदेश फिरला. २२ ऑगस्टला महानिरीक्षक सुप्रिया पाटील-यादव यांनी दुसरा आदेश जारी केला. ज्यात पदोन्नतीवर सहायक पोलिस निरीक्षकांना कार्यमुक्त न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मुंबई येथे मॅटमध्ये कुण्या अधिकाऱ्याने प्रकरण (क्रमांक ८३४ / २०२५) दाखल केले. त्यामुळे ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त ब्रेक लागला आहे.
पुढील आदेशापर्यंत वाट पहा
मॅटमधील या प्रकरणाच्या अनुषंगाने निरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या कुणालाही कार्यमुक्त करण्यात येऊ नये, जेथे पदोन्नतीवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले गेले असेल त्यांना पूर्वीच्या पदावर अर्थात मुळ घटकात परत पाठविण्याचे आदेश जारी करण्यात आले. पुढील आदेशापर्यंत पदोन्नतीची ही स्थिती राहणार आहे. आदल्या रात्री पदोन्नती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्थगनादेश अशी स्थिती ३६४ पोलिस निरीक्षकांबाबत निर्माण झाली आहे. आनंदोत्सव साजरा करण्यापूर्वीच पदोन्नतीला ब्रेक लागल्याने पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.