भोकर न्यायालयाचा भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा निकाल; लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:40 IST2026-04-08T19:37:56+5:302026-04-08T19:40:17+5:30
या खटल्यात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यावरून आरोपीने पदाचा गैरवापर करून लाच घेतल्याचे सिद्ध झाले.

भोकर न्यायालयाचा भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा निकाल; लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरीची शिक्षा
भोकर (जि. नांदेड): शाळेच्या बांधकामाचा निधी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भोकर पंचायत समितीतील तत्कालीन अभियंता तुकाराम आनंदराव चौतमल यांना भोकर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. १० वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत चौतमल दोषी आढळले आहेत. न्यायाधीश मोहम्मद नसिर मोहम्मद सलीम यांनी हा निकाल दिला असून, कारावासासोबतच आरोपीला एकूण १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
१८,९०० रुपयांच्या धनादेशासाठी अडवणूक
हे प्रकरण २०१४ मधील असून, फिर्यादी अशोक सोळंके हे ताटकळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत शाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या निधीतील १८,९०० रुपयांचा उर्वरित धनादेश देण्यासाठी अभियंता चौतमल यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २,५०० रुपये ठरले आणि त्यापैकी १,५०० रुपये स्वीकारताना 'एसीबी'ने त्यांना रंगेहाथ पकडले होते.
सहा साक्षीदारांची साक्ष ठरली निर्णायक
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक भीमराव शिंगाडे यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजादरम्यान सरकारी वकील ॲड. अनुराधा डावखरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यावरून आरोपीने पदाचा गैरवापर करून लाच घेतल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वये आरोपीला दोषी धरत ही सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे शासकीय कामात लाच मागणाऱ्या प्रवृत्तींना चाप बसणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.