कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 03:59 PM2021-10-20T15:59:28+5:302021-10-20T16:07:14+5:30

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

zp govt employees facing challenges due to inter district transfer | कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

कसा फुलणार शिक्षक दाम्पत्यांचा संसार?

Next
ठळक मुद्देशिक्षक दाम्पत्य आंतर जिल्हा बदलीसाठी दहा दहा वर्षांपासून प्रतीक्षेत

नागपूर : पती नागपूरला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर पत्नी यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. हे दोघेही १३ वर्षांपासून एकमेकांपासून दूर आहे. पत्नीला नागपूर जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदली करून आणण्यासाठी पतीचे गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रयत्न अपयशी ठरत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा अशा बदल्या होतात. जिल्ह्यांतर्गत बदल्या सहज होऊन जातात; परंतु आंतरजिल्हा बदल्यांसाठी बऱ्याच अडचणी असल्याने दहा-दहा वर्षांपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाही. बदल्यांमध्ये अपंग, विधवा, परितक्त्या, दुर्धर आजार व पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु २०१७ च्या बदल्यासंदर्भातील शासन निर्णयात आंतरजिल्हा बदलीसाठी सिंगल एनओसीची अट घातल्याने पती-पत्नी एकत्रीकरण या श्रेणीतील बदल्या पुन्हा प्रलंबित राहिल्या आहेत. आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते; परंतु खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात ७० दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत

नागपूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळविण्यासाठी ७० शिक्षक दाम्पत्य प्रयत्नशील आहे; पण शिक्षण विभागाचे आठमुठे धोरण, शासन निर्णयातील अडचणीच्या तरतुदीमुळे या दाम्पत्यांना १० ते १५ वर्षांपासून बदल्यांचा लाभ मिळालेला नाही.

काय आहे अडचण?

शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातील २०११ चा शासन निर्णय होता. त्यात पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते; परंतु बदल्याच्या संदर्भात २०१७ मध्ये निघालेल्या नवीन शासन निर्णयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एनओसीच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्राधान्य देण्यात येत असल्याने आंतरजिल्हा बदलीचे अनेक प्रकरण प्रलंबित राहत आहे. शिवाय शिक्षण विभागाने २०१० पासून रोस्टर नियमित केले नाही. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जागा रिक्त असतानाही ऑनलाइन पोर्टलवर टाकण्यात येत नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या प्रलंबित आहे.

कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ

शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. भांडणे वाढली आहेत. घटस्फोटापर्यंत प्रकरणे पोहोचली आहेत. कुटुंबाचे सान्निध्य नसल्यामुळे गैरसमज वाढले आहेत. मुलांची हेळसांड होत आहे. भावंडाची ताटातूट एक आईकडे, तर दुसरा वडिलांकडे राहत आहेत. पती-पत्नी दूर असल्याने घर असूनही नसल्यासारखे आहे.

-प्रवीण राऊत, शिक्षक

Web Title: zp govt employees facing challenges due to inter district transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.