जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार
By गणेश हुड | Updated: March 14, 2024 19:12 IST2024-03-14T19:11:58+5:302024-03-14T19:12:35+5:30
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षक भरती होत आहे.

जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार
नागपूर: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षक भरती होत आहे. पवित्र पोर्टलमार्फत नागपूर जि.प.साठी ३४५ शिक्षकांची निवड सूची आयुक्त कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. सदर शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आली. गुरुवारी समुपदेशनातून ३२५ शिक्ष्कांना नियुक्ती देण्याची प्रक्रीया शिक्षण विभागामार्फत राबवली जात आहे. रात्री उशिरापर्यत ही प्रक्रीया चालणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मागील काही वर्षांपासून शिक्षकांची भरती झालेली नाही.
भरतीमध्ये निवड होणे, टीईटी व सीटीईटीची पात्रता सिद्ध करणे, भरतीचा उशिराने निकाल लागणे, पवित्र पोर्टलच्या भरतीबाबत असंख्य याचिका कोर्टात जाणे, अशा विविध संकटांनंतर शिक्षकांची भरती प्रक्रिया होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारीच ही प्रक्रीया पूर्ण करण्याचा जि.प.प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेत शिक्षकांची ९०० पदे रिक्त असून ३२५ नवीन शिक्षकांची भरती होणार आहे. याचा विचार करता समुपदेशनातून सर्वप्रथम शुन्य शिक्षकी शाळांवर या शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे.