आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीसाठी तरुण ठरला ‘देवदूत’
By योगेश पांडे | Updated: August 16, 2024 16:38 IST2024-08-16T16:37:37+5:302024-08-16T16:38:20+5:30
Nagpur : तलावात उडी मारून वाचविला जीव

Youth becomes 'angel' for student who jumped into lake to commit suicide
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती वाद झाल्यानंतर संतापातून फुटाळा तलावात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीसाठी २० वर्षांचा तरूण देवदूत ठरला. त्याने हिंमत दाखवत तलावात उडी मारून बुडणाऱ्या मुलीला जीवदान दिले. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने उडी मारली नसती तर विद्यार्थिनीचा सर्वांसमोर बुडून मृत्यू झाला असता. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कुणाल राकेश चौधरी (२०, हजारीपहाड, गिट्टीखदान) असे संबंधित दिलेर विद्यार्थ्याचे नाव आहे. १८ वर्षीय विद्यार्थिनीचा कुटुंबियांसोबत वाद झाला. त्या वादानंतर ती घरातून बाहेर पडली व थेट फुटाळ्याजवळ पोहोचली. थोड्यावेळ फुटाळा तलाव परिसरात थांबल्यानंतर ती कठडयावर चढली व थेट तलावात उडी घेतली. ती बुडत असल्याचे पाहताच लोकांनी आरडाओरड केली. मात्र कुणीही तिला वाचविण्यासाठी समोर आले नाही. तेथे उभा असलेल्या कुणालने कसलाही विचार न करता थेट तलावात उडी घेतली व संबंधित मुलीपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, इतरांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. बीट मार्शल राजेंद्र सोमकुवर व विनोद सानप यांनीदेखील तत्काळ तेथे पोहोचून कुणालला मदतीचा हात दिला. तिघांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला. मुलगी सुखरूप असल्याची शाश्वती झाल्यावर तिच्या कुटुंबियांना फोन करून बोलविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी तिचे समुपदेशन केले. त्यानंतर राकेशला पोलीस ठाण्यात बोलवून त्याचा सत्कार करण्यात आला.