लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागालाही बसला. तीन-चार महिने वगळता वर्षभरापासून ‘आपली बस’ सेवा ठप्पच आहे. कोरोना संकटाने जीवनपद्धती बदलली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार परिवहन विभागाने नियोजन करून आपली बस सेवा अधिक सक्षम करून शहरातील नागरिकांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. यावर बस बंद ठेवणे हा पर्याय नाही. यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोना संकट लवकर संपणार नाही, असे गृहीत धरून मनपाच्या परिवहन विभागाला व्यवस्था बदलावी लागेल. कोरोना संकट लक्षात घेता, काही ऑटोरिक्षाचालकांनी व काही खासगी बसचालकांनीही बदल करून प्रवाशांत सुरक्षित अंतर राहील, अशी व्यवस्था केली आहे. या धर्तीवर ‘आपली बस’मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
वर्षभरापूर्वी शहरात ३६० बस धावत होत्या. दरदिवशी यातून १.५० लाख प्रवासी प्रवास करीत होते, तर २० लाख रुपये उत्पन्न मिळत होते. सध्या ७० बस धावत असून, ३ ते ४ लाख उत्पन्न आहे. पूर्ण क्षमनेते बस धावल्यास दरमहा १२ कोटींचा खर्च व ७ कोटी उत्पन्न प्राप्त होते. बस कमी धावत असल्याने उत्पन्न कमी झाले, पण मनपाचा तोटा कमी झाला आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध करणे ही मनपाची जबाबदारी असल्याने तोटा कमी कसा राहील, हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून काहीच सुधारणा करायच्या नाही, असे धोरण नागरिकांच्या हिताचे नाही.
......
वाचलेला निधी सुधारणावर खर्च करावा
मनपाच्या परिवहन विभागाला दरवर्षी ६० ते ७० कोटींचा तोटा होतो. मागील वर्षात बस बंद असल्याने तोटा कमी झाला आहे. हा वाचलेला ३० ते ४० कोटींचा निधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमधील बदलावर, इलेक्ट्रीक बसमधील मनपाचा वाटा, डेपोची उभारणी, वर्कशॉप, सीएनजी बस अशा बाबींवर खर्च करण्याची संधी आहे.
बंटी व बाल्या यांच्या सत्तासोपानात धन्यता!
मनपाच्या परिवहन विभागाचे राजकारण मागील चार-पाच वर्षांपासून बंटी कुकडे व बाल्या बोरकर यांच्याभोवती फिरत आहे. शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सुविधा कशी उपलब्ध होईल, याचा विचार न करता बाल्या व बंटी यांच्या सत्तापरिवर्तनाशिवाय चांगले घडताना दिसत नाही. या दोघांना सभापती कसे करता येईल, यातच मनपात सत्ता असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते धन्यता मानत आहेत.
...
सीएनजी परिवर्तन रखडले
परिवहन विभागाच्या ताफ्यात सध्या ४३७ बस आहेत. यात स्टँडर्ड बस २३७, मिडी बस १५०, मिनी ४५ व इलेक्ट्रिक ५ बस आहेत. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी २३७ स्टँडर्ड बसचे सीएनजीमध्ये परिवर्तन करण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू आहे. यातील जेमतेम ५५ बस परिवर्तित झालेल्या आहेत. ही प्रक्रिया रखडली आहे. कोरोनाकाळात याला गती का मिळाली नाही, हा प्रश्नच आहे.
...
कोरोना संकटात खबरदारी गरजेची
- प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक.
- सॅनिटायझरचा वापर व्हावा.
- बसमध्ये सुरक्षित अंतर राहील अशी व्यवस्था.
- बसचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण यंत्रणा उभारावी.
- तिकिटाची ऑनलाईन सुविधा करावी.