भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीला भोसकले; तरुणी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 15:31 IST2022-11-25T15:11:55+5:302022-11-25T15:31:56+5:30
पाटणसावंगी परिसरातील घटना

भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीला भोसकले; तरुणी गंभीर जखमी
खापा (नागपूर) : देवदर्शनासाठी बाेलावलेल्या प्रेयसीला ऑटाेतून उतरविले आणि दाेघेही पायी चालू लागले. काही दूर जाताच प्रियकराने तिचे ताेंड दाबले व तिच्या गळा व छातीवर चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून, ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी परिसरात गुरुवारी (दि. २४) सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. आराेपी प्रियकरास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली.
मुकेश अंबिका बिंद (२६, रा. हनुमान मंदिराजवळ, सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी प्रियकराचे नाव आहे. त्याचे नागपूर शहरातील तरुणीसाेबत प्रेमसंबंध हाेते. त्याने तिला गुरुवारी वाकी (ता. सावनेर) येथे देवदर्शनाला जाऊ, असे सांगून नागपूरहून बाेलावले हाेते. दाेघेही ऑटाेने आले आणि पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील बसस्टाॅपवर उतरले. त्यानंतर दाेघेही गप्पा करीत वाकीच्या दिशेने पायी जाऊ लागले.
काही दूर जाताच गंगाजी बाबा मंदिराजवळ त्याने अचानक तिचे ताेंड दाबले आणि काही कळण्याच्या आत चाकूने तिच्या गळा व छातीवर वार केले. शिवाय, तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करवून घेत जखमी अवस्थेत पाेलिस ठाणे गाठले व घडलेली हकीकत ठाणेदार अजय मानकर यांना सांगितली. तिच्या तक्रारीवरून खापा पाेलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी मुकेश बिंद यास अटक केली. शिवाय, तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.