बाईकवरील व्हिडिओ कॉलिंग युवकाच्या जिवावर बेतली; पिकपची धडक, पल्सरस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 12:01 IST2022-05-26T11:48:28+5:302022-05-26T12:01:18+5:30
या धडकेत मीनल कोलते गाडीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला.

बाईकवरील व्हिडिओ कॉलिंग युवकाच्या जिवावर बेतली; पिकपची धडक, पल्सरस्वार जागीच ठार
सावनेर (नागपूर) : सावनेरवरून नागपूरमार्गे पल्सर मोटरसायकलने व्हिडिओ कॉलिंगवर बोलत जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीने धडक दिली. यात पल्सरस्वार युवक जागीच ठार झाला. मीनल धनलाल कोलते (२६) रा. चिंचपुरा, सावनेर असे मृत युवकाचे नाव आहे. जयस्वाल लॉन, जॉईन पटेल गॅरेज समोर बुधवारी सांयकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार: सावनेरहून नागपूर मार्गाने पल्सर मोटरसायकल क्रमांक एम.एच.४०- बी.व्ही. ३८९५ ने मिनल कोणते हा फिरायला जात होता. बाईक चालविताना तो व्हिडिओ कॉलिंगवर कुणाशी तरी बोलत होता. अशात जयस्वाल लॉन जवळील पटेल गॅरेज समोर नागपूर कडून भरधाव वेगाने पिकप गाडी आली. या गाडी पुढे दुसरी मोटर सायकल असल्याने पिकप गाडी चालकाने ओव्हरटेक केला. तेवढ्यात विरुद्ध दिशेच्या पल्सर गाडीला धडक लागली. या धडकेत मीनल कोलते गाडीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला. या अपघातात मीनल जागीच ठार झाला. त्याला सरकारी रुग्णालय आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर डोंगरे यांनी मृत घोषित केले. सावनेर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक सतीश पाटील तपास करीत आहेत.