धुळवडीचा रंग काढायला गेला अन् तलावात बुडाला, मित्राच्या डोळ्यादेखत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:48 IST2023-03-09T11:42:18+5:302023-03-09T11:48:33+5:30

सुराबर्डी तलावातील घटना

young man drowned in Surabardi lake on holi day | धुळवडीचा रंग काढायला गेला अन् तलावात बुडाला, मित्राच्या डोळ्यादेखत मृत्यू

धुळवडीचा रंग काढायला गेला अन् तलावात बुडाला, मित्राच्या डोळ्यादेखत मृत्यू

वाडी (नागपूर) : धुळवडीनंतर अंघाेळ करण्यासाठी दाेन मित्र सुराबर्डी तलावात गेले. अशातच पाय घसरल्याने तरुण तलावात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी तलाव येथे मंगळवारी (दि.७) दुपारी १.३० वाजताच्यासुमारास घडली.

राज तिवारी (वय २०, रा. शाहू ले-आऊट, वाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी धुळवड खेळल्यानंतर राज व त्याचा मित्र खुशाल हे दाेघेही अंघाेळ करण्यासाठी सुराबर्डी येथील तलावात पाेहाेचले. दाेघांनाही पाेहायला येत नव्हते. दरम्यान, तलावाच्या काठावर पाण्यात उतरून अंगावरील रंग काढताना राजचा पाय घसरला व ताे तलावात बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात खुशालही घसरला आणि पाण्यात बुडू लागला. तिथे उपस्थित नागरिकांनी खुशालला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तलावातील खाेल पाण्यात बुडून राजचा मृत्यू झाला.

नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दल व पाेलिसांना दिली. मृतदेह शाेधण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच काळ मृतदेह हाती लागला नाही. लगेच गाेताखाेर जगदीश खरे यांची मदत घेण्यात आली. सुमारे अर्धा तास शाेध घेतल्यानंतर गाेताखाेर जगदीश खरे यांनी राजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: young man drowned in Surabardi lake on holi day