खापरखेडा : दुर्धर आजारामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा वाॅर्ड क्र. ३ बिना संगम येथे नुकतीच घडली.
सिद्धार्थ रामाजी गजभिये (२१, रा. वाॅर्ड क्र. ३, बिना संगम) असे मृत तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थ हा गळ्याच्या कॅन्सर आजारामुळे गेल्या दीड वर्षापासून त्रस्त हाेता. त्याच्यावर नागपुरातील एनसीजी कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. २ ऑगस्ट राेजी कॅन्सरचा त्रास वाढल्याने त्याने राहत्या घरी सिलिंग फॅनला दाेरीच्या साह्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला कामठीतील खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांच्या सूचनेवरून खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस नाईक दीपक रेवतकर करीत आहेत.