प्राण्यांबरोबर पाहायला मिळेल इतिहासाची सफर, गोरेवाड्यात होणार 'थीम पार्क' होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:45 IST2025-07-04T19:45:17+5:302025-07-04T19:45:59+5:30

Nagpur : डायनासोर पार्क, जीवाश्म प्रदर्शन अन् रेल फॉरेस्ट थीम पार्क

You will get to see a journey through history with animals, a 'theme park' will be built in Gorewada | प्राण्यांबरोबर पाहायला मिळेल इतिहासाची सफर, गोरेवाड्यात होणार 'थीम पार्क' होणार

You will get to see a journey through history with animals, a 'theme park' will be built in Gorewada

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात तिसऱ्या टप्प्यात 'पुरातत्त्वीय थीम पार्क' तसेच झू क्षेत्रात 'डायनासोर पार्क', जीवाश्म संग्रहालय आणि रेल फॉरेस्ट थीम पार्क उभारण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून ५०७ हेक्टरवर होणाऱ्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या मास्टर प्लानला मिळालेल्या मंजुरीनुसार ही कामे करण्यात येणार आहेत.


गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात पहिल्या टप्प्यात 'इंडियन सफारी'चे काम पूर्ण होऊन २६ जानेवारी २०२१ रोजी उद्घाटन झाले होते. दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित 'अफ्रिकन सफारी'साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत १ जुलै रोजी एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला आहे. त्यानुसार आफ्रिकन सफारीचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील टप्प्यात 'पुरातत्त्वीय थीम पार्क' उभारण्याचे काम होणार आहे. या पार्कचा आराखडा तयार करण्याचे काम पुण्यातील डेक्कन कॉलेजला देण्यात आले होते. मात्र, त्यांनी आराखडा तयार न केल्यामुळे आता राज्य पुरातत्व विभागाची मदत घेण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली असून याबाबत लवकरच सामंजस्य करार होणार आहे. करारानंतर हा आराखडा स्वतंत्र मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल.


'डायनासोर पार्क'मध्ये काय असेल ?
गोरेवाडा प्रकल्पाचे व्यवस्थापक शतानिक भागवत यांच्यानुसार जंगल सफारीकडील भागात 'डायनासोर थीम पार्क' उभारले जाईल. यात पृथ्वीची निर्मिती कशी झाली, डायनासोर कसे आले, मानवाची उत्पत्ती आदींची माहिती थीमच्या स्वरूपात दिली जाईल. मध्य भारतात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचे विविध जीवाश्मही येथे प्रदर्शित केले जातील. यासोबतच झू क्षेत्रालगत एक्झॉटिक एव्हियरी आणि रेल फॉरेस्ट थीम पार्कही उभारले जाईल. येथे उष्ण कटिबंधातील सुंदर आणि रंगीबेरंगी पक्ष्यांना ठेवण्यात येणार आहे. 


जंगल सफारी क्षेत्रात राहणार पुरातत्त्वीय थीम पार्क
पुरातत्त्वीय थीम पार्क गोरेवाडा जंगल सफारी क्षेत्राकडील भागात उभारण्यात येणार आहे. या भागात महत्त्वाचे मेगालिथिक शिल्प आढळतात. हे प्राचीन शिल्प अंदाजे इ.स.पू. ४०० ते इ.स. २०० च्या कालखंडातील आहेत. त्यामुळे या भागाची माहिती, तांत्रिक विषय आणि नागरिकांना पार्कविषयी माहिती देण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाची मदत घेतली जाणार आहे.


"गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या ५०७हेक्टर क्षेत्रातील मास्टर प्लानला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. मात्र पुरातत्त्वीय थीम पार्कसाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. पुरातत्त्व विभागाच्या मदतीसाठी चर्चा सुरू आहे. विकास आराखडा तयार होताच तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल."
- चंद्रशेखर बाला, सीईओ, एफडीसीएम गोरेवाडा प्राणिसंग्रहालय, नागपूर


 

Web Title: You will get to see a journey through history with animals, a 'theme park' will be built in Gorewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.