महाराजांची वाघनखे बघता येणार आता नागपूर येथील अजब बंगल्यातील संग्रहालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:28 IST2025-02-08T17:27:45+5:302025-02-08T17:28:50+5:30

Nagpur : शिवकालीन शिवशस्त्र व वाघनखे प्रदर्शनाचा शुभारंभ

You can now see Maharaj's tiger claws in the museum in the Ajab bungalow in Nagpur. | महाराजांची वाघनखे बघता येणार आता नागपूर येथील अजब बंगल्यातील संग्रहालयात

You can now see Maharaj's tiger claws in the museum in the Ajab bungalow in Nagpur.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. त्यांनी संकट काळातही हिमतीने व कल्पकतेने यातून मार्ग काढला. शिवाजी महाराजांनी मावळ्यांची फौज तयार करून स्वातंत्र्याची सुरुवात केली. जल व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जाती-धर्माचा सन्मान, असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. त्यांचा इतिहास हा प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.


मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोस्ट मास्टर जनरल (नागपूर परिक्षेत्र) शोभा मधाळे, मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ज्या वाघनखांचा वापर केला होता. ती वाघनखे मोठ्या प्रयत्नानंतर आपण आणली आहेत. सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली. महाराष्ट्राला मिळालेल्या या शौर्याच्या वारसाची अनुभूती पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुण, विद्यार्थी, नागरिकांनी घेतली. ही अनुभूती घेण्याची संधी विदर्भातील युवकांना, जनतेला मिळाली असून, याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी संबधित विभागाने नियोजन करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 


वाघनखांच्या टपाल तिकिटाचे अनावरण
कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रे या माहिती पुस्तिकेचे तसेच वाघनखांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


संग्रहालयासाठी ७० कोटी : शेलार
नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाला जुने वैभव प्राप्त व्हावे, यासाठी पुन्हा विकसित करण्यात येणार असून, यासाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिली. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास शिवशस्त्र गौरव गाथा विदर्भातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली.

Web Title: You can now see Maharaj's tiger claws in the museum in the Ajab bungalow in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.