‘ये है अपना लेव्हल’...बंदुकीची काडतुसे हातात ठेवत ‘फिल्मीस्टाईल’ मागितली खंडणी

By योगेश पांडे | Updated: July 25, 2023 18:16 IST2023-07-25T18:14:27+5:302023-07-25T18:16:59+5:30

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

Yeh Hai Apna Level holding gun cartridges in hand, demands ransom Filmstyle | ‘ये है अपना लेव्हल’...बंदुकीची काडतुसे हातात ठेवत ‘फिल्मीस्टाईल’ मागितली खंडणी

‘ये है अपना लेव्हल’...बंदुकीची काडतुसे हातात ठेवत ‘फिल्मीस्टाईल’ मागितली खंडणी

नागपूर : उपराजधानीच्या विविध भागांमध्ये गुंडांचे प्रमाण वाढत असून खंडणीसाठी धमकी देण्याचे प्रकारदेखील दिसून येत आहेत. एका गुंडाने चक्क बंदुकीच्या गोळ्या किराणा दुकानदाराच्या हातात ठेवत त्याला ‘फिल्मीस्टाईल’ खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

सन्नी शाहू (२५, आभाताई कॉलनी, भरतवाडा रोड) असे आरोपीचे नाव आहे. २३ जुलै रोजी सन्नीने राकेश हेमचंद शाहू (३८, नेताजीनगर) यांना फोन करून कळमन्यातील लक्ष्मीनगर येथे बोलवले. राकेश तेथे गेले असता सन्नीने एखाद्या ‘डॉन’ची स्टाईल मारत त्यांच्या हातात बंदुकीची दोन काडतुसे ठेवली व ‘माझी पातळी कुठपर्यंत आहे ते पाहून घे, जर किराणा दुकान सुरू ठेवायचे असेल तर दर महिन्याला मला एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल’, असे तो म्हणाला. राकेश यांनी पैसे देण्यास नकार दिला असता सन्नीने त्यांना शिवीगाळ करत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. राकेश यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी सन्नीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याच्याकडे बंदुकीची काडतुसे कुठून आली याबाबत त्याच्या परिचयातील लोकांची चौकशी सुरू आहे.
 

Web Title: Yeh Hai Apna Level holding gun cartridges in hand, demands ransom Filmstyle