साहित्यातूनच यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित
By Admin | Updated: November 26, 2014 01:04 IST2014-11-26T01:04:17+5:302014-11-26T01:04:17+5:30
प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने

साहित्यातूनच यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित
धनराज वंजारी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
नागपूर : प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने समाजमनाला उभारी दिली आणि समाजाला समोर नेले. आपले साहित्य आणि संतपरंपरांचे संचित घेऊनच यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व साकारले. कलांवर प्रेम आणि जगभरातल्या साहित्याच्या वाचनातून त्यांची सामाजिक दृष्टी व्यापक झाली होती. त्यामुळेच त्यांनी रचलेल्या पायावर आज महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे. साहित्यातून यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित झाली, असे मत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे यशवंतरावांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. हा कार्यक्रम बाबूराव धनवटे सभागृहात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे, रमेश बोरकुटे, अजय पाटील, डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. वंजारी म्हणाले, यशवंतरावांना व्यापक सांस्कृतिक दृष्टी होती. त्यामुळेच महाराष्ट्राचे संस्थापक ते आहेत. शिवाजी महाराजांप्रमाणेच यशवंतरावांनीही सामान्य तळागाळातल्या माणसासाठी प्रामाणिक काम केले. त्यामुळेच त्यांना प्रति शिवाजी असेही म्हटले जात होते. आरक्षण देतानाही केवळ कोटा भरणे हा त्यांचा दृष्टिकोन नव्हता तर शोषितांना यानिमित्ताने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कळकळीने काम केले. यासाठीच ते गावकुसाबाहेर असलेल्या तमासगीरांच्या तमाशात जायचे. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून तमाशातील कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ज्या वैचारिक, साहित्यिक, सामाजिक दृष्टीने राजकारण करावे लागते ते आदर्शवत राजकारण यशवंतरावांनी केले. मूल्यांचे अवमूल्यन होत असताना नव्या पिढीला त्यांचे कार्य समजून घेतल्याशिवाय विकास साधता येणार नाही. भाषा, कला, संस्कृती, समाज आणि समाजाचे उन्नयन हा त्यांच्या राजकारणाचा मंत्र होता. असा मुख्यमंत्री पुन्हा लाभणार नाही, असे वंजारी म्हणाले.
गिरीश गांधी म्हणाले, यशवंतरांवामध्ये बालपणापासूनच आत्मविश्वास होता. यशवंतरावांच्या अनुयायांनीच त्यांनी दिलेल्या संस्काराचे पालन केले नाही, त्यामुळे मूल्यांची पडझड राज्यात झाली. आजही त्यांच्या विचारांनीच जाण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. आभार रमेश बोरकुटे यांनी मानले. (प्रतिनिधी)