याकूबची स्ट्रॅटेजी
By Admin | Updated: July 22, 2015 03:13 IST2015-07-22T03:13:16+5:302015-07-22T03:13:16+5:30
फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी, यासाठी याकूब मेमनने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे.

याकूबची स्ट्रॅटेजी
नरेश डोंगरे नागपूर
नव्याने दयेचा अर्ज : वकिलांनी पूर्वीच दिले होते संकेत
फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी, यासाठी याकूब मेमनने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्ज पूर्वनियोजित स्ट्रॅटेजी आहे. विशेष म्हणजे, असे काही केले जाणार याचे संकेत याकूबच्या स्थानिक वकिलाने सोमवारी रात्री तर, दिल्लीतील वकिलाने मंगळवारी दुपारीच दिले होते. त्यामुळे याकूबची ही व्यूहरचना कोणत्या वळणावर जाते आणि त्यासाठी किती कालावधी लागतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, याकूब मेमनने १२ मार्च १९९३ ला मुंबईत भीषण बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. यात २५७ निरपराध लोकांचे बळी गेले तर ७०० पेक्षा जास्त लोकांना दुखापत झाली होती. बॉम्बस्फोटानंतर दाऊद, टायगर आणि याकूब देशातून पळून गेले होते. त्यानंतर याकूबला अटक करण्यात आली. हा समर्पणाचा प्रकार होता, असे बोलले जात होते. दरम्यान, टाडा कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. प्रकरणात १२३ आरोपी होते. त्यातील १२ जणांना मृत्युदंडाची शिक्षा, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ६८ लोकांना वेगवेगळी शिक्षा सुनावण्यात आली तर २३ लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली; नंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ आरोपींपैकी ११ जणांचा मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित केली तर याकूब मेमनला कटाचा सूत्रधार मानत त्याच्या मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. परिणामी याकूब मेमनने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. दरम्यान, याकूबचा डेथ वॉरंट निघाल्यामुळे याचिकेच्या सुनावणीकडे देश-विदेशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. ही याचिका न्यायालयाने मंगळवारी दुपारी खारीज केली.
त्यामुळे याकूबचा शेवटचा पयार्यही संपल्याची देशभर चर्चा सुरू झाली.
वकिलांनी दिला पर्याय
नागपूर : याकूबला आता ३० जुलैला फासावर टांगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त प्रसारित होत असतानाच सायंकाळी ६ च्या सुमारास याकूबचे स्थानिक वकील अॅड. अनिल गेडाम यांनी याकूबने दयेचा अर्ज केल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटाच्या संबंधाने नवा विषय सर्वत्र चर्चेला आला.
विशेष म्हणजे, मंगळवारी क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी असताना अॅड. गेडाम यांनी सोमवारी दुपारी कारागृहात जाऊन याकूबची भेट घेतली होती.
त्यानंतर सायंकाळी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना ‘याचिका खारीज झाल्यास’ आमचे अन्य पर्याय शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे पर्याय कोणते, ते सांगण्याचे त्यांनी टाळले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी याकूबचे दिल्लीतील वकील अॅड. शुबेल फारुख नागपुरात आले. त्यांनीही उस्मान मेमनला घेऊन कारागृहात याकूबची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ‘क्युरिटीव्ह‘ आणि त्यानंतर काय, याबाबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर ते बाहेर आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे सांगितले. क्युरिटीव्ह खारीज झाल्यास काय, या प्रश्नावर त्यांनी कायद्यानुसार पर्याय खुले असल्याचे सांगून, पुन्हा मार्ग शिल्लक असल्याचे सूचक संकेत दिले. त्यावेळी याचा उलगडा झाला नव्हता. दरम्यान, दुपारी २.३० च्या सुमारास न्यायालयाने क्युरिटीव्ह याचिका खारीज केली. त्यानंतर अॅड. अनिल गेडाम पुन्हा कारागृहात याकूबच्या भेटीला गेले. त्यानंतर याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज केल्याचे उघड झाले. सोबतच दोन्ही वकिलांकडून सुचविण्यात आलेला पर्याय म्हणजे ‘याकूबने केलेला दयेचा अर्ज होय‘, हे स्पष्ट झाले. सोबतच याकूबची स्ट्रॅटेजीही उजेडात आली. दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला शिक्षा ठोठावल्यानंतर त्याची कायदेशीर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया तब्बल २२ वर्षांनंतर सुरू झाली. मात्र, मंगळवारी पुन्हा एक पर्याय पुढे आल्यामुळे शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.