जागतिक परिचारिका दिन; तुटपुंज्या पगारावर मानावे लागते समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 10:18 IST2018-05-12T10:18:09+5:302018-05-12T10:18:15+5:30
खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही किमान वेतन कायदा लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे.

जागतिक परिचारिका दिन; तुटपुंज्या पगारावर मानावे लागते समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या विशेषत: खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही किमान वेतन कायदा लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे. येथे कायद्याचे सरंक्षण नाही. नोंदणीकृत अर्हता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मान-सन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कम्पाऊंडर, कधी कधी रुग्णांकडूनही शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोर जावे लागते. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दु:खाची झालर अधिक असल्याचे चित्र उपराजधानीतील आहे.
आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा १२ मे रोजी जन्मदिन. त्यांचा जन्मदिन हा जागतिक ‘परिचारिका दिन’ म्हणून दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात साजरा केला जातो. परंतु आजही खासगी परिचारिकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नसल्याचे वास्तव आहे.
बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणाऱ्या रु ग्णांची शुश्रूषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच असते.
मात्र त्यांच्या समस्यांकडे विशेषत: काही खासगी रुग्णालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार खासगी इस्पितळांमधील परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. शहरात अडीचशे मोठे इस्पितळ आहेत. यात साधारण बाराशे परिचारिका कामाला आहेत. परंतु यातील बहुसंख्य परिचारिका किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात काम करीत आहे. कायद्याचं संरक्षण नसल्याने अपमानांचे डोंगरच घेऊन त्या जगत आहेत. ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जात आहे. तरीही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत आहे.