लाकूडविरहित अंत्यसंस्कार : नागपुरात लाकडाऐवजी घाटावर मिळणार गोवऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:28 IST2019-11-13T00:24:52+5:302019-11-13T00:28:42+5:30
महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली.

लाकूडविरहित अंत्यसंस्कार : नागपुरात लाकडाऐवजी घाटावर मिळणार गोवऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली. विविध जळाऊ मिश्रणापासून तयार केलेल्या गोवऱ्या घाटावर नि:शुल्क मिळणार असून आता लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे.
अंत्यविधीसाठी मनपाच्या काही घाटावर नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून दिली जातात. परंतु याचा खर्च मनपा प्रशासनाला परवडणारा नाही. शिवाय, पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण व्हायचा. दरम्यानच्या काळात विद्युतदाहिनी स्थापन करण्यात आली. मात्र अजूनही नागरिकांनी ही पद्धत फारशी स्वीकारली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जातो. एका शवदहनासठी साधारण ३०० ते ५०० किलो लाकडांचा वापर होतो. शव जाळल्यावर उरलेली रक्षाही पर्यावरणाला पूरक नाही. ही राख नदीचा प्रवाह प्रदूषित करत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यावर उपाययोजना व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गोवऱ्या पर्यायी सोय करण्यात आली आहे. या गोवऱ्या जळाऊ मिश्रणापासून बनविण्यात आल्या आहे. या गोवऱ्या म्हणजे सहा ते १२ इंचाचे गोळे आहेत. या गोवºया घाटावर नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून हा नवा नियम सर्व घाटावर लागू करण्यात आल्याची माहिती आहे. मंगळवारी बसपाचे उत्तम शेवडे यांनी त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांवर या गोवऱ्याच्या मदतीनेच अंत्यसंस्कार केले. याला अरुण साखरकर, शंकर थूल, विनोद सहकाटे यांनी सहकार्य केले. शेवडे यांचे म्हणणे आहे, मनपाने लाकडे वाचविण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. पर्यावरणासाठी लाकूडविरहीत अंत्यसंस्कार गरजेचे आहे. या गोवऱ्या जळाऊ साहित्यापासून केल्याने त्या लाकडासारख्याच जळतात.