नागपूरकर महिला वेगाने होताहेत लठ्ठ
By Admin | Updated: June 24, 2017 02:12 IST2017-06-24T02:12:30+5:302017-06-24T02:12:30+5:30
कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१५-१६ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

नागपूरकर महिला वेगाने होताहेत लठ्ठ
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल : शहर व ग्रामीण भागातील २३.३ टक्के महिला पीडित
केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१५-१६ मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात १५ ते ४९ वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आला. नागपूर शहरातील २७.५ टक्के महिलांचे ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) २५ किलो प्रतिवर्ग मीटरपेक्षा जास्त तर ग्रामीण भागातील १२.४ टक्के महिला या जास्त वजनाच्या असल्याचे समोर आले.
एकूण २३.३ टक्के महिलांमध्ये ही समस्या दिसून आली. सर्वेक्षणामधील ही आकडेवारी आश्चर्यजनक आहे. सूत्रानुसार, गेल्या एक दशकात लठ्ठपणामध्ये सहा ते सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबाचा आजारही वाढला आहे.
ग्रामीण पुरुषांमध्ये मधुमेह अधिक
सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये मधुमेहाची समस्या अधिक आहे. नागपुरातील शहरी भागात ८.४ टक्के पुरुषांना उच्च व ३.८ टक्के पुरुषांना अत्याधिक उच्च मधुमेह आढळून आला आहे. तर ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये १४.५ टक्के उच्च तर १०.४ टक्के अत्याधिक उच्च मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. नागपुरात शहरी भागात ५.३ टक्के महिलांमध्ये उच्च (हाय) व २.५ टक्के महिलांमध्ये अत्याधिक उच्चस्तरावरील मधुमेह दिसून आला आहे. तेच ग्रामीण महिलांमध्ये हे प्रमाण क्रमश: ३.५ व १.३ टक्के आहे.
राष्ट्रीय स्तरावर समस्या
राष्ट्रीय स्तरावर लठ्ठपणाचे प्रमाण महिलांमध्ये २०.७ टक्के तर पुरुषांमध्ये १८.६ टक्के आहे. शहरी भागात ३१.३ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १५ टक्के महिला लठ्ठपणाच्या समस्येने पीडित आहेत. शहरात राहणाऱ्या पुरुषांमध्ये २६.३ टक्के तर ग्रामीण भागात राहणाऱ्या १४.३ टक्के लठ्ठपणाचे प्रमाण आहे.
बदलेली जीवनशैली, आहार मुख्य कारण
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, लठ्ठपणा, मधुमेहाचे प्रमाण गेल्या एक दशकापासून नागपुरात गतीने वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे. त्याच प्रमाणे मधुमेहाचे रुग्णही वाढत आहे. या सर्वांमध्ये बदलेली जीवनशैली व असंतुलित आहार हा जबाबदार आहे. महिलांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण सर्वाधिक आहे, कारण, लहानपणापासून आहाराकडे दुर्लक्ष झालेले असते. काही प्रकरणांमध्ये काही आजारही लठ्ठपणाचे कारण ठरते.
१८.४ टक्के पुरुष लठ्ठ
नागपुरातील १८.४ टक्के पुरुष हे लठ्ठपणाला बळी पडले आहेत. यात शहरी भागातील १९.२ टक्के तर ग्रामीण भागातील १७ टक्के पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शहरातील १८.२ टक्के पुरुषांचा आणि ग्रामीणमधील २०.८ टक्के पुरुषांचा ‘बीएमआय’ १८.५ किलो प्रति वर्ग मीटरने कमी आला आहे. म्हणजेच, पुरुषांचे वजन सामान्यपेक्षाही कमी आहे.
अॅनिमिया मोठी समस्या
महिलांमध्ये ‘अॅनिमिया’ ही मोठी समस्या आहे. नागपूर शहरात १५ ते ४९ वयोगटातील ४५ टक्के महिलांना तर ग्रामीण भागातील ५०.७ टक्के महिलांना हा आजार आहे. पुरुषांमध्येही अॅनिमियाचे प्रमाण दिसून आले आहे. यात शहरी भागात २१.२ तर ग्रामीणच्या १५.३ टक्के पुरुष ‘अॅनिमिक’ आहेत.