पोलीस उपनिरीक्षक महिलेची बलात्काराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:14 IST2019-05-23T21:12:18+5:302019-05-23T21:14:02+5:30
विक्रीकर अधिकारी असलेल्या प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविले तर, त्याने दगाबाजी केल्यामुळे केंद्रीय राखीव दलात (सीआरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात कटुता निर्माण झाल्याने ही नाट्यमय घडामोड पुढे आली.

पोलीस उपनिरीक्षक महिलेची बलात्काराची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विक्रीकर अधिकारी असलेल्या प्रियकराने दुसरीकडे लग्न जुळविले तर, त्याने दगाबाजी केल्यामुळे केंद्रीय राखीव दलात (सीआरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक असलेल्या प्रेयसीने बलात्काराचा आरोप लावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात कटुता निर्माण झाल्याने ही नाट्यमय घडामोड पुढे आली.
प्रेयसी ३२ वर्षांची आहे तर आरोपीचे नाव संघरत्न गजभिये आहे. दोघेही नागपुरातील रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी ती गिट्टीखदानमध्ये पोलीस शिपायी म्हणून मुख्यालयात कार्यरत होती. दोघेही महत्त्वाकांक्षी होते. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. एकत्र अभ्यास करायचे. त्यामुळे आधी ओळख आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. पुढे गजभियेला विक्रीकर विभागात नोकरी लागली. तो मुंबईला रुजू झाला आणि नालासोपारा परिसरात राहायला गेला. ती देखिल सीआरपीएफमध्ये पीएसआय म्हणून रुजू झाली. सध्या ती पालघरला राहते. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यात नियमित शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे. काही दिवसांपासून त्यांच्यात कटुता निर्माण झाली. वारंवार खटके उडू लागले. संबंधात वितुष्ट निर्माण आल्याने गजभियेने दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळविले. त्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेतली. १३ एप्रिल २०११ ते १३ एप्रिल २०१९ असे तब्बल आठ वर्षे लग्नाचे आमिष दाखवून गजभियेने वारंवार शरीरसंबंध जोडले. त्याने आता दुसरीकडे लग्न जुळवून आपली फसवणूक केली आणि धमकी दिल्याचा आरोप तिने तक्रारीत लावला. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी गजभियेविरुद्ध बलात्कार करून फसवणूक करणे, धमकी देणे आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
तक्रार पालघरला, तपास गिट्टीखदानकडे
बलात्काराचा आरोप लावणाऱ्या पीएसआयने पालघर ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, सर्वांत पहिल्यांदा त्यांच्यात गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण तपासासाठी गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. कागदपत्रे उपलब्ध झाली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे गिट्टीखदानचे ठाणेदार सतीश गुरव यांनी लोकमतला सांगितले.