Woman police biting dogs's owner is gangster | महिला पोलिसाचे लचके तोडणारी कुत्री गँगस्टरची !

महिला पोलिसाचे लचके तोडणारी कुत्री गँगस्टरची !

ठळक मुद्देपुढे आलेल्या माहितीमुळे पोलीस दलात खळबळकुत्र्यांकडून हल्ला करवून घेतल्याच्या चर्चेला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहायक पोलीस उपनिरीक्षक डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जागोजागी मांस तोडून काढणारी कुत्री कुख्यात गँगस्टर शेखू खान याची असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, डिम्पल यांच्यावरील हल्ला स्वाभाविक नव्हता तो तर करवून घेण्यात आल्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे.
बेलतरोडी ठाण्यात कार्यरत असलेल्या एएसआय डिम्पल नायडू यांच्यावर रविवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. ही कुत्री त्यावेळी संजना आणि रजत देशमुख या दाम्पत्याच्या ताब्यात होती. त्यांनी शूट गो म्हणताच या कुत्र्यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला चढवला, असा आरोप डिम्पल यांनी बेलतरोडी ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून केला आहे.
डिम्पल यांनी बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची तसेच शुक्रवारी पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांची भेट घेतली आणि त्यांना आपली कैफियत ऐकवली. आपल्या हातात एक वर्षाचे बाळ होते. खतरनाक कुत्र्यांनी आपल्याला आणि मदतीला धावलेल्या पतीलाही गंभीर जखमी केले. आपला चिमुकला कुत्र्यांच्या तावडीत सापडला असता तर किती भयावह झाले असते, असा प्रश्न त्यांनी या दोन्ही वरिष्ठांकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, देशमुख दाम्पत्य आणि डिम्पलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. संजना देशमुख यांचा भाऊ विजय सिंग हा या अपार्टमेंटमध्ये तर देशमुख दाम्पत्य प्रतापनगरात राहायचे. अधून मधूनच ते येथे यायचे. मात्र, महिनाभरापासून ते या ठिकाणी राहायला आले. साळा आणि मुलीसोबत ते येथे राहू लागले. काही दिवसांपूर्वीच विजयने ही कुत्री येथे आणली. या कुत्र्यांनी डिम्पलच्या घरी काम करणाऱ्या महिलेसह तीन चार जणांवर हल्ला केल्याने वाद तीव्र झाला. त्यावेळी देशमुख दाम्पत्याकडून कुत्र्यांना आवरण्यात आले.
मात्र, डिम्पलवर ज्यावेळी कुत्र्यांनी हल्ला चढवला त्यावेळी कुत्र्यांना आवरण्याऐवजी देशमुख दाम्पत्य डिम्पल यांना हालचाल करू नका, पळू नका, असा सल्ला देत होते. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाल्यानंतर देशमुख दाम्पत्याने कुत्र्यांना दुसरीकडे पाठवून दिले. तिकडे चौकशीत ही कुत्री गँगस्टर शेखूची असल्याचे पुढे आले.
विशेष म्हणजे, प्रारंभी कुत्री कुणाची आहे, या संबंधाने माहिती देण्यासाठी देशमुख दाम्पत्य टाळाटाळ करीत होते. नंतर त्यांनी ही कुत्री स्रेहल नामक तरुणीची असल्याचे सांगितले. ही स्रेहल म्हणजेच शेखूची खास मैत्रिण होय.

ती हीच कुत्री होती का?
शेखूला अटक करण्यापूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची अनेक दिवसपर्यंत गोपनीय माहिती काढली होती. तो राहत असलेले ठिकाण कळताच गुन्हे शाखेच्या पथकाने मनीषनगरातील एका बंगल्यावर छापा मारला होता. त्यावेळी त्या बंगल्याच्या आवारात तीन खतरनाक कुत्री मोकाट अवस्थेत दिसल्याने पोलिसांना बंगल्यात शिरणे कठीण झाले होते. त्यांनी बाजूच्या इमारतीवरून उड़ी मारून बंगल्यात छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी तेथून शेखूचा साथीदार शिवा तसेच स्रेहलला पिस्तुलासह अटक केली होती. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच शेखू पळून गेला होता. नंतर काही दिवसांनी पोलिसांनी शेखूला धरमपेठमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून साथीदारांसह अटक केली होती. एका दारू व्यावसायिकाकडून पिस्तुलाच्या नोकावर लाखोंची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली शेखू आणि साथीदारांवर मकोका लावून त्यांना पोलिसांनी कारागृहात डांबले आहे. त्यामुळे त्याची कुत्री पोरकी झाली. विजय हा शेखू आणि स्रेहलच्या संपर्कात होता. त्यामुळेच ही कुत्री स्रेहलकडून विजयने आणली असावी असा अनेकांचा कयास आहे.

प्रसंगी ते जीवही घेतात !
तीन पैकी दोन कुत्री रॉड वीलर प्रजातीची तर एक कोकिशन शेफर्ड प्रजातीचा असल्याचे समजते. रॉड वीलर अत्यंत चिड़चिड़ा आणि आक्रमक वृत्तीचा असतो. त्यामुळे विदेशात या प्रजातींचे कुत्रे पाळण्यावर बंदी असल्याचे सांगितले जाते. ही कुत्री रागात आल्यास त्यांना नियंत्रित करणे कठीण होते. रागाच्या भरात ते एवढे आक्रमक होतात की प्रसंगी ते आपल्या मालकावरसुद्धा जीवघेणा हल्ला करतात. एका प्रकरणात या कुत्र्यांनी मालकासह कुटुंबातील तिघांचा जीव घेतल्याचेही सांगितले जाते. पोलीस अधिकारी यासंबंधाने अधिकृतपणे बोलायला टाळत आहेत. चौकशी सुरू असल्याचे जुजबी उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे.

कुत्र्यांकडून हल्ला करवून घेतल्याचा आरोप खोटा
सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू पवार यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ला करवून घेतला नाही तर डिम्पल यांनी कुत्र्याला लाथ मारल्यामुळे कुत्र्यांनी त्यांना चावा घेतला, असा खुलासा संजना आणि रजत देशमुख या दाम्पत्याने केला आहे.
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एएसआय डिम्पल नायडू पवार गंभीर जखमी झाल्या. त्यासंबंधाने त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या वृत्ताने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. डिम्पल यांनी केलेल्या आरोपाचा देशमुख दाम्पत्याने इन्कार केला आहे. देशमुख म्हणाले, डिम्पल या पहिल्या माळ्यावर तर आम्ही दुसºया माळ्यावर राहतो. मी माझे कुत्रे सायंकाळी फिरायला घेऊन जात असताना डिम्पल यांनी फ्लॅटमध्ये कुत्रे का आणले, अशी विचारणा करीत वाद घातला. यावेळी डिम्पल यांनी कुत्र्याला लाथ मारल्याने आणि नंतर चपलेने मारल्याने कुत्रे हिंसक झाले त्यातून त्यांनी डिम्पल यांना चावे घेतल्याचा दावा देशमुख दाम्पत्यांनी केला. आपण कुत्र्यांना आवरण्याचा तसेच डिम्पल यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचेही संजना देशमुख म्हणाल्या.

Web Title: Woman police biting dogs's owner is gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.