‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले
By योगेश पांडे | Updated: May 25, 2023 17:59 IST2023-05-25T17:57:19+5:302023-05-25T17:59:08+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात सव्वातीन लाख गमावले
नागपूर : ‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात एका तरुणाने सव्वातीन लाख रुपये गमावले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
निलेश संपत पहाडे (३०, जयदुर्गा ले आऊट, मनिषनगर) असे तरुणाचे नाव आहे. निलेश एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. मार्च महिन्यात त्यांना व्हॉट्सअपवर अनोळखी क्रमांकावरून मॅसेज आला व त्याने टेलिग्राम ॲपवर टास्क पूर्ण करण्याचे काम असून ‘वर्क फ्रॉम होम’मधून पैसे मिळतील असे आमिष दाखविले. निलेश यांनी त्याच्याशी टेलिग्रामवर संपर्क साधला. अज्ञात व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून तपशील भरायला तसेच नोंदणीची रक्कम भरण्यास सांगितली. निलेश यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया केली असता त्यांच्या बॅंक खात्यातून सव्वातीन लाख रुपये दुसरीकडे वळते झाले. निलेश यांना फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.