दीक्षाभूमी आंदोलनातील भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या; नितीन राऊतांची मागणी
By आनंद डेकाटे | Updated: July 3, 2024 17:38 IST2024-07-03T17:38:11+5:302024-07-03T17:38:41+5:30
Nagpur : नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

Withdraw the charges against Bhimsainiks in Dikshabhoomi movement
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून झालेल्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. तेव्हा आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी माजी मंत्री, आमदार नितीन राऊत यांनी बुधवारी विधानसभेत केली.
दीक्षाभूमी येथे पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात-अज्ञात आंदोलकांवर बजाजनगर पोलिसांनी दोन गंभीर प्रकाराचे गुन्हे दाखल केले आहे. ज्यावेळी भूमिगत पार्किंग विरोधात नागरिकांमधला रोष समाज माध्यमातून व्यक्त होत होता त्यावेळी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काय करीत होते? असा प्रश्न ही राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला.