हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार, कंत्राटदारांना थकबाकी मिळणार
By योगेश पांडे | Updated: November 3, 2025 18:10 IST2025-11-03T18:06:26+5:302025-11-03T18:10:35+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : कामठी, मालेगाव आणि सिल्लोडमध्ये अनेक ठिकाणी दुबार-तिबार मतदार

Winter session will be held in Nagpur, contractors will get dues
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुर्णविराम लावला आहे. कंत्राटदारांनी कामे सुरू ठेवावीत. त्यांचे पैसे लवकरच दिले जाईल. नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बावनकुळे यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांच्या खासदारांनी सुद्धा चुकीच्या मतदार यादीवरून निवडणूक जिंकली, ते मतचोरी करून जिंकले. आता मात्र भाजपवर टीका करत आहेत. अशीच जर मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
मतदार यादीतील अनियमिततेबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचे म्हणो पूर्णपणे बरोबर आहे. राहुल गांधीचे, कॉंग्रेसचे लांगुलचालन करणारे खरे महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सर्वाना माहित आहे. कामठी, मालेगाव आणि सिल्लोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुबार आणि तिबार मतदार आहेत, काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच नावे एका कुटुंबात आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला. कामठीत सुमारे आठ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावे दुबार आहेत. या संदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे त्यांनी सांगितले.
नरखेड येथील व्हायरल ऑडिओ संदर्भात चौकशी २४ तासांत होईल. यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर कठोर कारवाई केली जाईल. पीक विम्यासाठी २ ते ५ रुपयांचे चेक दिल्याच्या माहितीची चाचपणी होत आहे. जुने चेक दाखवून भ्रामक माहिती देण्यात आली का, हेही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांसाठी दोन नवे टॉवर उभारण्याचा विचार
नागपुरातील अनेक सरकारी बंगले जुने झाले आहेत. त्यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी उधळपट्टी होते. नागपुरात मंत्री व अधिकाऱ्यांसाठी दोन नवीन टॉवर उभारण्याचा विचार आहे. हेरिटेज नसलेल्या जागी हाय-राईज टॉवर उभारण्याची योजना आहे. रवी भवन नागपूरबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन सादर करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.